- भारतीय संस्कृतीचा अविस्मरणीय जल्लोष…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपळे सौदागर (दि. १० ऑक्टोबर २०२५) :- उन्नती सोशल फाउंडेशन आयोजित भव्य दांडिया ग्रुप डान्स स्पर्धा अत्यंत उत्साहात आणि सांस्कृतिक जल्लोषात पार पडली. स्व. बाळासाहेब कुंजीर क्रीडांगण, पिंपळे सौदागर येथे दिनांक ५ ते ७ ऑक्टोबर २०२५ या तीन दिवसीय उत्सवात सायंकाळी ६.०० ते १०.०० या वेळेत तब्बल ४० ग्रुप्सनी सहभाग नोंदविला. पारंपरिक आणि आधुनिक नृत्यरचना सादर करून सहभागी ग्रुप्सनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
या स्पर्धेमध्ये प्रत्येक ग्रुपला रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले. या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ मनोरंजनापुरता दांडिया न ठेवता, त्याला स्पर्धात्मक व सांस्कृतिक अधिष्ठान देण्याचा प्रयत्न उन्नती सोशल फाउंडेशनने केला.
उन्नती सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. कुंदाताई संजय भिसे म्हणाल्या, “आज अनेक ठिकाणी दांडिया संध्याकाळ आयोजित केल्या जातात, परंतु त्यामध्ये फक्त डीजे आणि गोंगाट एवढ्यापुरतेच स्वरूप राहते. मात्र उन्नती सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही या दांडिया कार्यक्रमाला स्पर्धात्मक रूप दिले आहे. या उपक्रमातून देशातील विविध संस्कृती, पारंपरिक नृत्यशैली आणि लोककला एकत्र येऊन भारतीय संस्कृतीचे सुंदर दर्शन घडते.”
चिंचवड विधानसभेचे आमदार मा. शंकरभाऊ जगताप म्हणाले, “उन्नती सोशल फाउंडेशनने घेतलेली ही पुढाकारपूर्ण पावले म्हणजे समाजातील एकात्मतेचे दर्शन आहे. तरुण पिढीला संस्कृतीशी जोडून ठेवण्याचे हे उत्तम माध्यम ठरते.”
मावळ लोकसभेचे खासदार मा. श्रीरंग आप्पा बारणे यांनी सांगितले, “अशा उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. युवकांना त्यांची कला सादर करण्यासाठी व्यासपीठ मिळते, हे अत्यंत स्वागतार्ह आहे.”
प.पू. भाषाप्रभू पंकज महाराज गावडे यांनी आशीर्वचन देताना म्हटले, “दांडिया हा केवळ मनोरंजनाचा कार्यक्रम नसून तो भक्ती, संस्कृती आणि आनंदाचा संगम आहे. उन्नती सोशल फाउंडेशनने समाजाला एकत्र आणणारा, संस्कार जपणारा उपक्रम राबविला आहे.”
या तीन दिवसीय स्पर्धेत अभिनेत्री रत्ना दहिविलकर, तसेच सुप्रसिद्ध गायक, संगीतकार आणि अभिनेते अवधूत गांधी यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढली. त्यांनी आपल्या कलात्मक सादरीकरणाने प्रेक्षकांना भावविभोर केले.
कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध आणि भव्य पद्धतीने पार पडला. हजारो नागरिकांनी उपस्थित राहून या दांडिया उत्सवाचा मनमुराद आनंद घेतला.
कार्यक्रमास खासदार श्रीरंग आप्पा बारणे, आमदार शंकरभाऊ जगताप, उद्योजक विजय पांडुरंग जगताप, माजी नगरसेविका निर्मला कुटे, जयनाथ काटे, पी.के. स्कूलचे संस्थापक जगन्नाथ आप्पा काटे, आंतरराष्ट्रीय कबड्डी पंच दत्ता झिंजुर्डे, सामाजिक कार्यकर्त्या अनिता काटे, राजू शेलार, अतुल पाटील, भाजपा ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मनोज ब्राह्मणकर, शरद कुटे, संतोष काटे, उल्हास मेटे, शंकर चौंधे, भाजपा सांस्कृतिक प्रकोष्ट जिल्हाध्यक्ष विजय भिसे, राजू भिसे (चेअरमन, ऑस्टिन रिअॅलिटी) यांच्यासह विठाई वाचनालय, आनंद हास्य क्लब, ऑल सिनियर सिटिझन्स असोसिएशन, लिनिअर गार्डन जेष्ठ नागरिक संघ आणि पिंपळे सौदागर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हा उपक्रम उन्नती सोशल फाउंडेशनच्या सामाजिक-सांस्कृतिक कार्याचा एक उत्तम नमुना ठरला असून, नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे भारतीय संस्कृतीचा जल्लोष अधिकच खुलला.