न्यूज पीसीएमसी नेटवर्क
आकुर्डी : मा. उपमुख्यमंत्री व मा. पालकमंत्री अजितदादा पवार आज सोमवार दिनांक १ ऑक्टो. रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या पुढील निवडणुकीच्या अनुषंगाने पदाधिका-यांसोबत आढावा बैठक घेण्याकरीता पिंपरी-चिंचवड शहरात आले होते.
यावेळी नगरसेवकांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या तक्रारींचा पाडा पवार यांच्यासमोर वाचला. आयुक्त भाजपचे प्रवक्ते असल्यासारखे वागतात, राष्ट्रवादीच्या नगरसवेकांची कामे अडवतात, दुजाभाव करतात आदी समस्या नगरसेवकांनी पवारांपुढे वाचल्या.
यावेळी अजित पवार म्हणाले कि, पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची गेल्या २० वर्षांपासून सत्ता होती. या सत्ताकालावधीत आमच्या पक्षाने विरोधकांची कामे कधीच अडवली नाहीत. विरोधकांना नेहमीच मानसन्मान दिला. निधीची कमतरता पडू दिली नाही. अधिकारीदेखील कामे अडवत नव्हते. तत्कालीन आयुक्त दिलीप बंड, आशिष शर्मा, डॉ. श्रीकर परदेशी, राजीव जाधव यांनीसुद्धा विरोधकांना कायम सहकार्य केले.
पवार पुढे म्हणाले आयुक्तांकडून राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना दुजाभावाची वागणूक दिली जाते. विरोधक हे जनतेचे लोकप्रतिनिधी असून विरोधकांना योग्य तो मानसन्मान दिला पाहिजे. योग्य निधीही दिला तरच प्रभागातील कामे मार्गी लागतील अन्यथा भाजपने नागरिकांना स्मार्ट सिटीचे दाखवलेले गाजर कसे पूर्ण होणार? असा खरमरीत टोलाही यावेळी अजित पवार यांनी भाजपला मारला.
हार्डीकर हे यवतमाळचे जिल्हाधिकारी असताना चांगले काम करत होते, त्यामुळे महापालिकेत देखील ते चांगले काम करतील अशी अपेक्षा होती. परंतु भाजपने त्यांनाही दावणीला बांधल्याचे दिसते. त्यामुळे त्यांच्याकडून महापालिकेत चांगले काम होण्याची आशा मावळली. भाजप एका कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याचीच अशी अवस्था करत असेल तर इतरांकडून काय अपेक्षा ठेवणार? असा प्रश्नही यानिम्मिताने पवार यांनी उपस्थित केला.
यावेळी पक्ष बैठकीस शहराध्यक्ष संजोग वाघेरे, म. आमदार विलास लांडे, अण्णा बनसोडे, नाना काटे, वैशाली काळभोर, प्रशांत शितोळे, फजल शेख, निलेश पांढरकर, सुनील गव्हाणे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.