न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहगाव (दि. १४ ऑक्टोबर २०२५) :- खेड तालुक्यातील येलवाडी गावातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. गावाचे सरपंच रणजित गाडे आणि जिल्हा परिषद अध्यक्ष पदाचे संभाव्य उमेदवार गणेश बोत्रे यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले असून, १०० केव्हीए क्षमतेचे नवीन रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) आणि स्वतंत्र वीज वाहिनीचे विधिवत पूजन करून कार्यान्वयन करण्यात आले.
गेल्या काही महिन्यांपासून येलवाडी परिसरातील नागरिकांना सततच्या वीज खंडितीचा त्रास सहन करावा लागत होता. दररोज ४ ते ५ तास वीज नसल्याने नागरिक, शेतकरी आणि व्यावसायिकांना अडचणींचा सामना करावा लागत होता. गावातील झपाट्याने वाढणारी वीज मागणी आणि जुन्या यंत्रणेवरील ताण यामुळे ट्रान्सफॉर्मर वारंवार बंद पडत होता.
या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघावा यासाठी सरपंच रणजित गाडे आणि गणेश बोत्रे यांनी महावितरण विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळत नवीन ट्रान्सफॉर्मर आणि स्वतंत्र वाहिनी बसविण्यात आली आहे. या रोहित्राच्या कार्यान्वयनामुळे येलवाडी आणि परिसरातील वीज पुरवठा स्थिर होऊन नागरिकांना अखंड वीजसेवा मिळणार आहे.
कार्यक्रमावेळी सरपंच रणजित गाडे, पै. गणेश बोत्रे, उपसरपंच विक्रम बोत्रे, वैभव गाडे, संतोष बोत्रे तसेच महावितरणचे कर्मचारी उपस्थित होते.
येलवाडीतील नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत करत सरपंच आणि गणेश बोत्रे यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले.
                                                                    
                        		                    
							












