न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ जून २०१९) :- संतोषला चुलत मामाच्या मुलीसोबत लग्न करण्याची इच्छा होती. त्यातून त्याने २० मे रोजी दुपारी तरुणीला चिंचवड येथील बिग बाजारसमोरील रस्त्यावर गाठले. तुझे आजोबा खूप आजारी आहेत. तुझे आई-वडील त्यांना पाहण्यासाठी गेले आहेत. तुला माझ्यासोबत येण्यासाठी सांगितले आहे, अशी बतावणी केली. त्यानंतर रिक्षाने तिला वाकड येथे नेले. तेथून खासगी मोटारीने उंब्रज येथे घेऊन गेले. तेथून दुचाकीवरून काशिळ पाली येथील खिंडीत नेले.
तेथे गेल्यावर आरोपींनी तरुणीला तू संतोषसोबत लग्न कर, अशी जबरदस्ती केली. मात्र, तरुणीने नकार दिला. त्यावर आरोपींनी तिला ओढत टेकडीवर नेले आणि खाली ढकलून देण्याची धमकी दिली. त्यानंतर तिला एका मंदिरात नेले. तेथे आरोपी संतोष याने जबरदस्तीने तिच्या गळ्यात हार घातला. तिलाही संतोषच्या गळ्यात हार घालण्यास भाग पाडले. तर, रवि आणि बाबू यांनी दोघांचे गळ्यात हार घातलेले फोटो काढले. त्यानंतर तरुणीच्या कुटुंबाला मोबाईलवर कॉल करून संपवून टाकण्याची धमकी दिली. हा प्रकार २० मे रोजी दुपारी साडेतीन ते रात्री ११ च्या दरम्यान चिंचवड बिग बाजार ते सातार्यातील काशाळ पाली खिडींदरम्यान घडला आहे.
याप्रकरणी संतोष ज्ञानू अवघडे (वय २१), रवि मैनू अवघडे (वय २०) आणि बाबू आत्माराम अवघडे (वय २० तिघे रा. गुंजाळी, किल्ले मोरगिरी, ता. पाटण, जि. सातारा) या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत किवळे येथे राहणार्या १९ वर्षीय तरुणीने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पिंपरी पोलीस पुढील तपास करत आहेत.













