- महापालिका निवडणुकीसाठी केली पंधरा उमेदवारांची यादी जाहीर..
- सर्व जागांवर उमेदवार देण्याची आपची तयारी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ नोव्हेंबर २०२५) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या रणधुमाळीत आम आदमी पार्टीने भ्रष्टाचाराविरुद्ध निर्णायक लढा पुकारला आहे. ‘आप’चे नेते अजित फाटके यांच्या नेतृत्वाखाली, आगामी निवडणुकांसाठी पक्षाची पहिली उमेदवारी यादी जाहीर करण्यासाठी आणि शहराच्या विकास आराखड्यावर चर्चा करण्यासाठी एका अत्यंत महत्त्वपूर्ण पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. ही पत्रकार परिषद यशस्वीरित्या पार पडली आणि यामध्ये महायुतीच्या भ्रष्टाचारावर व ‘आप’च्या विकास मॉडेलवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या पत्रकार परिषदेत, ‘आप’च्या नेत्यांनी केवळ उमेदवारी यादी जाहीर करण्यावर नव्हे, तर दिल्ली-पंजाबमधील ‘आप’चा यशस्वी मॉडेल, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील भाजपच्या भ्रष्टाचारी कारभाराचा पर्दाफाश आणि महाराष्ट्र शासनातील ‘महायुती’च्या कथित घोटाळ्यांचा अभ्यासपूर्ण आढावा घेतला.
आम आदमी पार्टीने दिल्ली आणि पंजाबमध्ये “कामाचे राजकारण” कसे असते, हे सिद्ध केले. दिल्लीतील शैक्षणिक क्रांती अंतर्गत सरकारी शाळांचा कायापालट करून ‘आप’ने शिक्षण व्यवस्थेचा दर्जा आंतरराष्ट्रीय स्तरावर नेला, ज्यामुळे गरीब कुटुंबातील मुलांनाही उत्कृष्ट शिक्षण मिळवण्याचा हक्क मिळाला. ‘मोहल्ला क्लिनिक’च्या माध्यमातून घराजवळ मोफत आणि दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या, परिणामी आरोग्य खर्चात मोठी बचत झाली. दिल्लीत २०,००० लीटरपर्यंत मोफत पाणी आणि बहुतांश नागरिकांसाठी शून्य वीज बिल देऊन सर्वसामान्यांना महागाईतून मोठा दिलासा दिला गेला. तसेच, सर्व सरकारी विभागांमध्ये ऑनलाइन सेवा आणि पारदर्शक प्रणाली लागू करून भ्रष्टाचारावर ८० टक्क्यांहून अधिक नियंत्रण मिळवले आणि अनेक भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई झाली. पंजाबमध्येही ‘आप’चे सरकार आल्यानंतर अनेक ‘आम आदमी क्लिनिक्स’ सुरू करण्यात आले आणि ३७,००० हून अधिक तरुणांना सरकारी नोकऱ्या देऊन रोजगाराला प्राधान्य दिले. ‘आप’ सिद्ध करते की, राजकारणात हेतू चांगला असेल, तर पैसा कमी पडत नाही!
एकेकाळी आशियातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवडचा आज भ्रष्टाचाराच्या शहरांमध्ये समावेश होत आहे. पत्रकार परिषदेत, गेल्या अनेक वर्षांपासून महानगरपालिकेवर सत्ता असलेल्या भाजपने नागरिकांच्या पैशाची सर्रास लूट केल्याचा आरोप ‘आप’ नेत्यांनी केला. यामध्ये विकास कामांच्या निविदांमध्ये गैरव्यवहार आणि कंत्राटदारांचे साटेलोटे, शहरातील अनेक प्रकल्पांचे खर्च अव्वाच्या सव्वा वाढवून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा आणि स्थायी समिती व सामान्य सभेत केवळ ‘खोक्यांची’ भाषा झाली आणि शहराच्या विकासाची फाईल धूळ खात पडली, या प्रमुख बाबींवर लक्ष वेधण्यात आले. महायुती सरकार स्थापन झाल्यापासून राज्यात अनेक मोठे कथित घोटाळे चर्चेत येत आहेत. प्रशासनातील निर्णयप्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव आणि कंत्राटदारांचे हित जपले जाणे, यामुळे राज्याचा पैसा ठराविक लोकांच्या तिजोरीत जात आहे.
विविध प्रकल्पांमध्ये (1) वाकड येथिल 1500 कोटींचा TDR घोटाळा. 2)रस्ते सफाई कामामध्ये एकाच कामासाठी दोन वेळा 220 कोटींची निविदा रिग करून कामाचे वाटप 3) शहराचा DP प्लॅन एक वर्ष अगोदर अगोदर तयार एक वर्षानंतर जाही. 4) अतिरिक्त आयुक्त यांना 1 कोटींपेक्षा जास्त रकमेच्या कामास मंजुरी देता येत नाही. विविध कामांचे तुकडे करून करोडोची कामाचे आदेश. 5) भामा आसखेड पाणी प्रकल्पास 4 वेळा मुदतवाढ दिली. 6) सुरक्षा रक्षकांची निविदा प्रक्रिया राबवून सुद्धा कामाचे आदेश दिले जात नाहीत. 7) आकांक्षा फाऊडेशन ला सहा शाळा चालवण्यासाठी 42 कोटी प्रतिवर्ष दिले जाणार आहेत. झालेले कोट्यवधी रुपयांचे कथित गैरव्यवहार आणि त्यावरील तपास यंत्रणांची संशयास्पद भूमिका, याबद्दल ‘आप’ने अभ्यासपूर्ण माहिती सादर केली. पिंपरी-चिंचवडची जनता आता या भ्रष्टाचारी कारभाराला कंटाळली आहे!
आम आदमी पार्टी, दिल्ली-पंजाब मॉडेलच्या आधारावर, पिंपरी-चिंचवडमध्ये सत्तापरिवर्तनाची तयारी करत आहे. पत्रकार परिषदेत पुढील ध्येय निश्चित करण्यात आले: महानगरपालिकेच्या कारभारातून भ्रष्टाचार १००% संपवण्यासाठी ‘भ्रष्टाचार विरोधी दल’ आणि सर्व सेवा ऑनलाइन करून भ्रष्टाचार मुक्ती आणि ‘जीरो टॉलरन्स’ आणण्याचा निर्धार करण्यात आला. प्रत्येक प्रभागात ‘मोहल्ला क्लिनिक’ आणि महानगरपालिकेच्या शाळांचा दर्जा खासगी शाळांपेक्षा उत्कृष्ट करून दर्जेदार शिक्षण आणि आरोग्य सुविधा देण्याचे ध्येय आहे. दिल्लीच्या धर्तीवर मोफत पाणी आणि स्वस्त वीज उपलब्ध करून देण्यासाठी ठोस धोरण आखले जाईल. तसेच, कचरामुक्त शहर आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा विकास करून स्वच्छ आणि सुंदर शहर बनवले जाईल आणि पिंपरी-चिंचवडमधील उद्योगांना चालना देऊन तरुणांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगार संधी निर्माण करण्यावर भर दिला जाईल. ‘आप’चे नेते अजित फाटके यांनी आगामी निवडणुकीत ‘आप’ हा पिंपरी-चिंचवडच्या जनतेसाठी भ्रष्टाचाराविरोधात एकमेव आणि सक्षम पर्याय कसा आहे, हे पुराव्यानिशी सिद्ध केले. यासोबतच, प्रभाग निहाय व आरक्षण निहाय जागेसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली.
उमेदवारांची अशी आहेत नावे…
1) इम्रान मुस्ताक खान (प्रभाग ३ सर्वसाधारण ड), 2)मंगेश अनंत आंबेकर (प्रभाग ७ सर्वसाधारण ड), 3)संजीव झोपे (प्रभाग ९ सर्वसाधारण ड पुरुष), 4)ब्रह्मानंद जाधव (प्रभाग १० सर्वसाधारण ड), 5)कुणाल वक्ते (प्रभाग ११ सर्वसाधारण ड), 6)शीतल स्वप्नील जेवळे (प्रभाग १२ सर्वसाधारण महिला क), 7) वैजनाथ अंजिनाथ शिरसाट (प्रभाग १४ नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग अ), 8)विकी रोहिदास पासोटे (प्रभाग १६ अनुसूचित जाती अ), 9) शिवकुमार बनसोडे (प्रभाग १६ सर्वसाधारण ड), 10) राहुल निवृत्ती मदने (प्रभाग १७ नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग ब), 11) सचिन लक्ष्मण पवार (प्रभाग १८ सर्वसाधारण ड), 12) नवनाथ दशरथ मस्के (प्रभाग १९ सर्वसाधारण ड), 13) सुरेश भिसे (प्रभाग १९ अनुसूचित जाती महिला अ) 14) सुप्रिया गायकवाड (प्रभाग २० अनुसूचित जाती अ), 15) शुभम यादव (प्रभाग २० सर्वसाधारण ड), 16) रविराज बबन काळे (प्रभाग २६ सर्वसाधारण ड) आणि 17) उमा यल्लाप्पा वालदोर (प्रभाग ३० सर्वसाधारण महिला ड).











