न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ नोव्हेंबर २०२५) :- पिंपळे सौदागरच्या चॅलेंजर पब्लिक स्कूलमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त बालदिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांनी पंडित नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन करून केली. या विशेष उपक्रमातून विद्यार्थ्यांनी भारताच्या पहिल्या पंतप्रधानांविषयी आदरभाव व्यक्त केला.
कार्यक्रमाचे उद्घाटन शाळेचे संचालक संदीप काटे यांच्या प्रभावी भाषणाने झाले. आपल्या विस्तृत भाषणात त्यांनी मुलांचे व्यक्तिमत्त्व घडवण्यात शिक्षणाचे महत्व स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की “मुलंच आपल्या देशाची खरी संपत्ती आहेत. त्यांच्यातील प्रतिभा ओळखून ती योग्य दिशेने फुलवणे ही शाळेची तसेच पालकांची सामूहिक जबाबदारी आहे. पंडित नेहरू यांनी मुलांवर ठेवलेला विश्वास आणि प्रेम आजही आपल्याला नवनव्या कल्पनांची प्रेरणा देते.”
ते पुढे म्हणाले की, आजच्या काळात विद्यार्थ्यांना मूल्याधारित, प्रयोगशील आणि सर्वांगीण शिक्षण देणे अत्यावश्यक आहे. शाळा त्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी नमूद केले.
यानंतर शाळेच्या प्राचार्या सुविधा महाले यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या विस्तृत भाषणात सांगितले “बालदिन हा केवळ एक कार्यक्रम नसून मुलांच्या कल्पनाशक्ती, आत्मविश्वास आणि स्वप्नांना पंख देण्याचा दिवस आहे. प्रत्येक मूल अनोखे आहे. त्यांची क्षमता ओळखणे, त्यांना प्रोत्साहन देणे आणि सुरक्षित, सकारात्मक वातावरण देणे ही आमची जबाबदारी आहे.” तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना मेहनत, शिस्त आणि मूल्यांचा अवलंब करून उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी प्रोत्साहित केले.
कार्यक्रमात शाळेच्या शिक्षिका सुरभी मिश्रा यांनीही मनोगत व्यक्त करत म्हटले “मुलांचे बालपण हे त्यांच्या आयुष्याचे पायाभूत वर्ष असते. शिक्षणासोबतच सर्जनशीलता, सहकार्य, संवेदनशीलता या गुणांची जोपासना होणे आवश्यक आहे. पंडित नेहरू यांनी दाखवलेल्या आदर्शांचा आपल्या मुलांच्या विकासात मोठा वाटा आहे.”
कार्यक्रमात विविध सांस्कृतिक सादरीकरणे, विद्यार्थी सहभाग आणि शिक्षक–विद्यार्थी मैत्रीपूर्ण उपक्रमांचा समावेश होता. कार्यक्रमाचे संयोजन शाळेतील शिक्षकवर्गाने केले. उपस्थित पालक आणि विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.











