- चालकाच्या तत्परतेमुळे १५ प्रवासी सुखरूप…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ नोव्हेंबर २०२५) :- पिंपरीहून भोसरीकडे जात असलेल्या पीएमपीएमएल बसला कामगार भवनासमोर आज सकाळी पावणे बाराच्या सुमारास अचानक आग लागली. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन विभागाने तातडीने धाव घेत ही आग नियंत्रणात आणली. प्रसंगावधान राखत बसचालकाने सर्व १५ प्रवाशांना वेळेवर खाली उतरवल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
बस नेहरूनगरच्या दिशेने जात असताना तिच्या इंजिनमधून धूर निघत असल्याचे चालकाने लक्षात घेतले. त्याने तत्काळ दरवाजे उघडून प्रवाशांना सुरक्षित खाली उतरवले. काही क्षणांत आगीने इंजिन भाग व्यापला होता.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. परिसर रिकामा करून जवानांनी काही मिनिटांत आग पूर्णपणे विझवली. या दरम्यान परिसरात किरकोळ वाहतूक कोंडी झाली होती, जी पोलिसांनी लवकरच सुरळीत केली.
अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पथकाचे कौतुक केले. ऋषिकांत चिपाडे यांच्या नेतृत्वाखालील दलाने समन्वयाने काम करत मोठी दुर्घटना टळली. दरम्यान, वाहनातून धूर दिसल्यास त्वरित वाहन थांबवावे व १०१ वर संपर्क साधावा, असे आवाहन अग्निशमन विभागाने केले आहे.











