- प्रति महिना २ टक्के विलंब दंडही लागू…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ नोव्हेंबर २०२५) :- पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील ज्या मालमत्ताधारकांनी आर्थिक वर्ष २०२५-२६ चा मालमत्ता कर अद्याप भरलेला नाही, त्यांच्या बिलातील पहिल्या सहामाही रक्कमेवर प्रति महिना २ टक्के विलंब दंड लागू झाला आहे, अशी माहिती कर आकारणी व कर संकलन विभागाने दिली आहे.
महापालिका लवकरच दुसऱ्या सहामाहीच्या (ऑक्टोबर २०२५ ते मार्च २०२६) कर रकमेवर देखील विलंब दंड लागू करणार आहे. त्यामुळे नागरिकांनी अतिरिक्त आर्थिक भार टाळण्यासाठी तातडीने कर भरणा करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
महापालिकेने आर्थिक वर्षाच्या प्रारंभीच कर भरण्यास प्रोत्साहन देण्यासाठी विविध सवलती जाहीर केल्या होत्या. या सवलतींचा तसेच जनजागृती मोहिमेचा सकारात्मक परिणाम म्हणून शहरातील ७ लाख ३२ हजार मिळकतींपैकी ४ लाखांहून अधिक मालमत्ताधारकांनी कर भरला आहे. १ एप्रिल २०२५ ते १६ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत एकूण ६३९ कोटी रुपयांची वसुली करण्यात आली आहे.
जप्ती कारवाईला वेग
थकबाकीदारांवर कठोर भूमिका घेत महापालिकेच्या कर संकलन विभागाने जप्ती मोहिमेला गती दिली आहे.
थकबाकीदारांना नोटिसा देण्यासोबत विविध विभागीय कार्यालयांतून थेट मालमत्तांवर जप्तीची कारवाई सुरू करण्यात आली आहे. एकूण १८ विभागीय कार्यालयांमार्फत ही कारवाई राबवली जात आहे.
अधिकाऱ्यांचे प्रतिपादन
“कर संकलन मोहिमेला नागरिकांचा प्रतिसाद समाधानकारक असला, तरी मोठ्या प्रमाणात थकबाकी अद्याप बाकी आहे. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मालमत्ता कराचा वेळेत होणारा भरणा अत्यंत महत्त्वाचा आहे. ज्या मालमत्ताधारकांनी अजून कर भरलेला नाही, त्यांनी विलंब न करता तात्काळ कर भरावा. अन्यथा जप्तीची कारवाई अपरिहार्य आहे.”
— पंकज पाटील, उपायुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका











