- युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव चंद्रशेखर जाधव यांची मागणी..
- महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांना दिले निवेदन…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १७ नोव्हेंबर २०२५ :- महाराष्ट्रातील महत्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ अंतर्गत ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया पूर्ण करण्याची सध्याची मुदत संपुष्टात येत असतानाच, ही मुदत ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत वाढविण्यात यावी, अशी आग्रही मागणी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव चंद्रशेखर जाधव यांनी केली आहे. त्यांनी आज महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांना याबाबतचे सविस्तर निवेदन सादर केले.
निवेदनात जाधव यांनी म्हटले आहे की, राज्यातील लाखो पात्र लाभार्थी महिलांना सध्या ई-केवायसी पूर्ण करण्यात मोठ्या तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पोर्टलवर वारंवार येणारा सर्व्हर डाऊनटाइम, हंगामी इंटरनेट कनेक्टिव्हिटीच्या समस्या विशेषतः ग्रामीण व डोंगराळ भागात, आधार केंद्रे व सेवा केंद्रांवर प्रचंड गर्दी, तसेच बँक खात्यांशी आधार लिंकिंगमध्ये येणारे अडथळे यामुळे अनेक महिलांना वेळेत प्रक्रिया पूर्ण करता येत नाही.
“ही योजना महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाची खरी जीवनवाहिनी ठरली आहे. दरमहा १५०० रुपये थेट खात्यात जमा होणाऱ्या या मदतीवर अवलंबून असलेल्या अनेक कुटुंबांना मुदत संपल्यास लाभ गमावावा लागेल. त्यामुळे पात्र महिलांवर अन्याय होईल,” असे जाधव यांनी निवेदनात नमूद केले आहे.
ते पुढे म्हणतात, “सध्याची मुदत अत्यंत अपुरी आहे. ग्रामीण भागातील महिलांना आधार केंद्रापर्यंत पोहोचणे, आवश्यक कागदपत्रे जमा करणे, नेटवर्कची अनुपलब्धता यामुळे दिवसेंदिवस प्रलंबित प्रकरणांची संख्या वाढत आहे. त्यामुळे ई-केवायसीची मुदत किमान ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत वाढवली तरच सर्व पात्र महिलांना या योजनेचा खऱ्या अर्थाने लाभ मिळेल. व ही योजना खऱ्या अर्थाने पारदर्शक ठरेल, असेही जाधव यांनी यावेळी नमूद केले आहे.











