- अन्यथा टीडीआरवरील डीआरसी थांबवण्याचा महापालिकेचा इशारा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ नोव्हेंबर २०२५) :- भोसरी एमआयडीसीतील महात्मा फुलेनगर परिसरात सुरू असलेल्या एसआरए गृहप्रकल्पासाठी भूमिगत विद्युत केबल टाकताना महापालिकेची परवानगी न घेता रस्ता खोदल्याचे समोर आले आहे. नियमांची पायमल्ली करत केलेल्या या खोदकामामुळे महापालिकेच्या स्थापत्य विभागाने संबंधित डेव्हलपरवर एकूण ४८ लाख ९३ हजार १४४ रुपयांचा दंड ठोठावला आहे.
गृहप्रकल्पापर्यंत १३४ मीटर लांबीच्या रस्त्यावर केलेल्या या खोदाईतून रस्त्याचे नुकसान झाले. आम आदमी पक्षाने केलेल्या तक्रारीनंतर तपासात परवानगी न घेतल्याचे स्पष्ट झाले. महापालिकेने आधीच डेव्हलपरला नियमानुसार शुल्क भरण्याच्या सूचना दिल्या होत्या; मात्र त्या पाळल्या न गेल्याने कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली.
नोटीसनुसार, १६.३१ लाख खोदाई शुल्क आणि ३२.६२ लाख दुप्पट दंड चार्ज करून एकूण रक्कम ४८ तासांत कोषागारात जमा करणे बंधनकारक आहे. अन्यथा संबंधित प्रकल्पाला देण्यात येणाऱ्या टीडीआरसाठीची डीआरसी थांबवण्यात येईल, असा इशारा कार्यकारी अभियंता सतीश वाघमारे यांनी दिला आहे.











