न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३ जून २०१९) :- पिंपरी चिंचवड शहरासह नेहरूनगरसारख्या उपनगरांतही भटक्या कुत्र्यांसह डुकरांनी उच्छाद मांडला आहे. महापालिका प्रशासनाने कुत्र्यांचा, डुकरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी जोर धरत आहे.
ज्या ठिकाणी कच-याची समस्या आहे, अश्या ठिकाणी मोकाट कुत्र्यांनी व डुकरांनी उच्छाद मांडला आहे. भटक्या कुत्र्यांनी अनेकांचा चावा घेतला आहे. डुकरांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. शहरात मोकाट कुत्र्यांना पकडण्याची मोहीम राबविली जाते. पण, मोकाट कुत्र्यांची वाढती संख्या पाहता भटक्या कुत्र्यांना पकडून निर्बीजीकरण करण्याची मोहीम कितपत यशस्वी झाली, असा प्रश्न निर्माण झाला आहे. निर्बीजीकरण मोहिमेबाबत संबंधित संस्थेच्या कारभाराची चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.
भटक्या प्राण्यांमुळे अनेक आजार पसरतात. या प्राण्यांनी चावा घेतल्यास रेबीज होते. रोगट कुत्र्यांमुळे त्वचारोग पसरण्याची शक्यता असते. त्यामुळे भटक्या प्राण्यापासून दूर राहणे हिताचे आहे, असे डॉ. अनु गायकवाड यांनी सांगितले.
महापालिका प्रशासनाने भटक्या कुत्र्यांचा वेळीच बंदोबस्त न केल्यास पालिकेच्या इमारतीत कुत्री व डुकरे सोडली जातील, असा इशारा नगरसेवक राहुल भोसले यांनी दिला आहे.














