- २० महिन्यात पैसे दुप्पट करण्याचे आमिष; अनेकांकडून लाखो रुपये घेतल्याचे चौकशीत निष्पन्न…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
भोसरी (दि. २८ नोव्हेंबर २०२५) :- भोसरी येथे निलंबित पोलीस उपनिरीक्षक प्रमोद चिंतामणी आणि दोन साथीदारांविरोधात गुंतवणुकीवर पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवून ९३ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी संतोष तरटे यांनी केलेल्या तक्रारीवरून पोलीसांनी चौकशी केली असता चिंतामणी यांनी अनेक नागरिकांकडून मोठी रक्कम घेतल्याचे समोर आले.
फिर्यादी यांनी १८ लाख रुपये गुंतविल्यानंतर चिंतामणी यांनी त्यातील फक्त १५ लाख ४० हजार परत केले, उर्वरित रक्कम न देता फसवणूक केल्याचे दिसून आले. तसेच सहा अन्य व्यक्तींंकडूनही एकूण ७५ लाख रुपये घेतल्याचे चौकशीत उघड झाले.
या प्रकरणात चिंतामणी, गोरक्ष मेड आणि संदीप अहिर या तिघांवर भोसरी पोलीस ठाणे येथे विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप कोणालाही अटक नाही. पुढील तपास भोसरी पोलिसांकडून सुरू आहे.
















