न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३ जून २०१९) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने पुनावळे येथे राज्य शासनाच्या वन विभागाच्या जागेत कचरा डेपो सुरू करण्यासंदर्भात पालिकेने कार्यवाही सुरू केली आहे. त्या ठिकाणी कचरा डेपो सुरू करण्यास स्थानिकांचा विरोध आहे. त्यामुळे येथे डेपो सुरू करू नये, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक मयूर कलाटे यांनी केली आहे.
पुनावळे परिसरात रहिवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शेजारीच हिंजवडी आयटी पार्क आहे. येथे कचरा डेपो केल्यास या भागातील विकासावर व शहराच्या विकासावर तसेच, नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होईल, अशी तक्रार कलाटे यांनी केली आहे.
शहरातील प्रत्येक वॉर्डात त्या-त्या भागातील कचरा तेथेच जिरवणे आवश्यक आहे. त्यासाठी शासनाने उपाययोजना करावी. मात्र, पुनावळेत कचरा डेपो प्रकल्प राबविल्यास त्यास स्थानिक रहिवाशांकडून विरोध केला जाईल, असा इशारा कलाटे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिला आहे.











