- मंडळाच्या अध्यक्षाला दंडासह भोगावी लागली जेलवारी..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २८ नोव्हेंबर २०२५) :- गणेशोत्सव २०२५ दरम्यान लेझर आणि प्रखर बिम लाईट वापरण्यास पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांनी घातलेल्या मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी भैरवनाथ मित्र मंडळ, वैद्यवस्ती पिंपळे गुरव या मंडळाचे अध्यक्ष गोपी पंढरीनाथ लोखंडे यांच्यावर सांगवी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात न्यायालयाने त्यांना १,००० रुपये दंड आणि दोन दिवसांचा साधा कारावास अशी शिक्षा सुनावली आहे.
४ सप्टेंबर २०२५ रोजी पिंपळे गुरव येथे मंडळाने विसर्जन मिरवणूक काढताना लेझर व बिम लाईटचा वापर केला होता. पोलिसांनी पूर्वीच अशा लाईट्सवर बंदी असल्याची सूचना सर्व मंडळांना दिली होती. मात्र आदेशाचे उल्लंघन झाल्याने सांगवी पोलीस स्टेशनने गुन्हा क्रमांक ३४०/२०२५ नोंदवून आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे आणि वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सांगवी पोलिसांनी केली.
पोलिसांनी इशारा दिला असून, भविष्यातही अशा प्रकारची मनाईभंगाची घटना घडल्यास कठोर कारवाई करण्यात येईल.
















