- आ. अमित गोरखेंचा इशारा; ‘मागासवर्गीयांवरील अन्याय सहन करणार नाही’…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
काळेवाडी (दि. २७ नोव्हेंबर २०२५) :- प्रभाग क्रमांक-२० संत तुकारामनगर येथील म्हाडा जागेवर राहणाऱ्या राकेश कांबळे यांच्या कुटुंबाचे घर महानगर पालिका व क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी कोणतीही पूर्वसूचना किंवा अतिक्रमण हटवण्याची आवश्यक तातडीची नोटीस न देता बुलडोझर लावून पाडल्याची गंभीर बाब समोर आली आहे. कारवाईच्या वेळी घरामध्ये कुटुंबीय तसेच वयोवृद्ध सदस्य उपस्थित असूनही ही कारवाई करण्यात आल्याने मोठ्या प्रमाणावर नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे.
म्हाडाच्या जमिनीवरील बांधकामांवर कारवाई करण्याचा अधिकार महानगरपालिकेला नसताना, सर्वत्र अनधिकृत बांधकामे असतानाही ठराविक एका मागासवर्गीय कुटुंबालाच लक्ष्य करून कारवाई करण्यात आली, असा आरोप स्थानिकांनी केला आहे. ही कारवाई निव्वळ भेदभावपूर्ण असून कायद्याचा गैरवापर केल्याचे दिसून येत आहे.
या प्रकरणातील संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी आणि पीडित कुटुंबाला तत्काळ मदत व पुनर्वसन मिळावे, अशी मागणी आमदार अमित गोरखे यांनी आयुक्तांकडे केली आहे.
“संत तुकाराम नगरमध्ये मागासवर्गीय कुटुंबाचे घर कोणतीही नोटीस न देता पाडणे हा अत्यंत गंभीर आणि अमानुष प्रकार आहे. म्हाडाच्या जागेवर महापालिकेने कशी कारवाई केली याची सविस्तर चौकशी केली जाईल. संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. अशा प्रकारे दुर्बल व मागासवर्गीय कुटुंबांवर अन्याय होऊ देणार नाही. पीडित कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहोत.”
आमदार अमित गोरखे














