- पंधराशे कोटींच्या प्रकल्पासाठी निधी उभारणीची धडपड..
- महापालिकेचा शासनाकडे पाठपुरावा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ डिसेंबर २०२५) :- पिंपरी-चिंचवड शहराच्या मध्यवर्ती प्रवाहातून जाणाऱ्या पवना नदीच्या सुधार योजनेला निधीअभावी गती मिळत नाही. या प्रकल्पासाठी लागणारा तब्बल १,५५६ कोटी रुपयांचा खर्च मुळा व इंद्रायणी नदी सुधार योजनांपेक्षा अधिक असल्याने महापालिका कर्ज, म्युन्सिपल बॉण्ड आणि विविध अनुदानांचा पर्याय तपासत आहे.
किवळे, रावेत, चिंचवड, काळेवाडी, पिंपरी, कासारवाडी, रहाटणी, दापोडी, सांगवी अशा विस्तृत परिसरातून पवना नदी वाहते. वाढत्या नागरीकरणामुळे नदीकाठाला अनधिकृत बांधकामे, भंगार गोदामे, पत्राशेड, झोपडपट्टया मोठ्या प्रमाणात उभ्या राहिल्या आहेत. बांधकामांचा राडारोडा टाकणे, रासायनिक व प्रक्रिया न केलेले सांडपाणी नदीत सोडणे यामुळे पाणी काळसर हिरवे झाले असून तीव्र दुर्गंधी व जलपर्णीचा प्रादुर्भाव वाढला आहे.
पाणीपुरवठ्याचा प्रमुख स्त्रोत असलेल्या पवना नदीची स्थिती गंभीर बनली असताना प्रकल्पासाठी निधी उपलब्ध होणे आवश्यक आहे. परंतु नेहमीप्रमाणे महापालिका कर्जाचा डोंगर उभा करून हा प्रकल्प उभा करणार असल्याने करदात्यांच्या डोईवर पुन्हा भार पडणार आहे. नागरिकांनी दीर्घकाळ प्रतीक्षेत असलेल्या या प्रकल्पाला लवकरात लवकर गती देण्याची मागणी केली आहे.
“पवना नदी सुधार प्रकल्प शहरासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या प्रकल्पाचा खर्च मुळा आणि इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पांपेक्षा जास्त असल्याने निधी उभारणीची प्रक्रिया विविध माध्यमांतून सुरू आहे. केंद्र व राज्य शासनाकडून अनुदानासाठी सतत पाठपुरावा केला जात आहे. निधी उपलब्ध होताच निविदा प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्ष काम सुरू केले जाईल.”
संजय कुलकर्णी, मुख्य अभियंता – मनपा…












