न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३ जून २०१९) :- पर्यावरणाच्या रक्षणासाठी व संवर्धनासाठी पुण्यातील दोन महिला एकत्र येवून सुरू केलेल्या निगडी येथील “अर्थबीट” संस्थेच्या वतीने साडेतीन हजार बियांचे गोळे (सीडबॉल) टाकून वृक्षारोपण करण्यात येणार आहे. हे वृक्षारोपण पर्यावरण दिनी (५ जून) स. ९ वा पाषाण टेकडी येथे होणार असल्याची माहिती संचालिका प्रा. प्राजक्ता नरुटे व चैताली देशपांडे यांनी दिली.
स्थापत्य अभियांत्रिकी आणि मास्टर ऑफ़ इंव्हायर्मेंट्ल इंजिनिअरिंगची पदवी घेतलेल्या प्राजक्ता नरुटे आणि जैविक तंत्रज्ञानाची मास्टर पदवीधर असलेल्या चैताली देशपांडे यांनी कचरा व्यवस्थापनात स्थिरता, महिला सशक्तीकरण, पर्यावरण संवर्धन या त्रिआयामी संकल्पनेतून विविध उत्पादनांची निर्मिती केली आहे. रद्दीपासून सीडपेपर (बिया असलेला कागद) जैवीक कचरा व गोठ्यातील शेण वापरून सीडबॉल, सॅंपलिंग कप, प्लॅस्टिकविरहीत कुंडी (पॉट) या पर्यावरणपूरक वस्तूंची निर्मिती केली.
टाकवू पेपरपासून तयार केलेल्या पर्यावरण पूरक पेपरमध्ये बियांचा समावेश करून सीड पेपर तयार केला. तसेच जमिनीवरचे विघटन होणाऱ्या पर्यावरण पूरक घटकामंध्ये बियांचा समावेश करून आकर्षक असे सीडबॉल तयार केलेत. हे सीडबॉल कुठेही जमिनीवर ठेवल्यास पाण्याच्या संपर्कात आल्यास त्यापासून रोपटे तयार होते. ६ महिने टिकणारे हे सीडबॉल १५ दिवस पाण्याशिवाय राहू शकतात. पेपर व बॉल मध्ये ५ /६ बिया समाविष्ट केलेल्या आहे. या उत्पादनांचा व्यक्तिगत भेट किंवा कॉर्पोरेट गिफ्ट देण्यासाठी वापरला जावू शकतो. या उपक्रमातून महिला बचत गटांच्या माध्यमातून महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा मानस असल्याचे प्रा. नरुटे व देशपांडे यांनी व्यक्त केला आहे.











