- पैसे उकळण्याच्या वादातून सुरू झालेल्या हाणामारीने घेतलं हिंसक वळण..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ डिसेंबर २०२५) :- चिंचवड येथील एस.के.एफ. कंपनीजवळील मराठा दरबार हाॅटेल समोर मध्यरात्री दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारीने हिंसक रूप धारण केले. या घटनेत दोन्ही बाजूंनी एकमेकांवर गंभीर गुन्हे दाखल केले असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
पहिल्या प्रकरणात फिर्यादी आदित्य दिनकर चिंचवडे यांनी बसवराज हेळवे, शुभम शिंदे, शाम कोळी व इतर दोन जणांनी त्यांच्याकडून दर महिन्याला २५ हजार रुपयांचा हफ्ता मागितल्याचा आरोप केला आहे. पैसे न दिल्यास जीव घेण्याची धमकी दिल्यानंतर आरोपींनी रस्त्यावर पडलेली काच उचलून त्यांच्या डोक्यावर व कानावर वार करून जखमी केल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणात बसवराज, शुभम, शाम कोळी यांच्यासह अज्ञात दोघांवर गुन्हा दाखल झाला असून आरोपी क्रमांक ३ शाम कोळी याला अटक करण्यात आली आहे.
दुसऱ्या प्रकरणात फिर्यादी शुभम दत्तात्रय शिंदे यांनी आदित्य चिंचवडे, कार्तिक घोडके, शिवम हगवणे, सुनिल चिंचवडे व इतरांवर गंभीर आरोप केले आहेत. रस्ता क्रॉस करणाऱ्या व्यक्तीशी झालेल्या वादातून हाणामारी झाली. यात बसवराज हेळवे याच्या डोक्यावर काचेने प्राणघातक वार झाल्याचे नमूद आहे. तसेच आरोपींनी वायसीएम रुग्णालयापर्यंत पाठलाग करून शिवीगाळ केल्याचे, त्यानंतर दोन वाहनांनी फिर्यादीच्या चारचाकी गाडीला पाठलाग करून धडक दिल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
दोन्ही बाजूंनी जीवघेणा प्रयत्न, मारहाण, धमक्या व वाहनाचे नुकसान या गंभीर आरोपांसह गुन्हे दाखल झाले असून पोउपनि बळीप यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
















