- दत्तजयंती उत्सव वेदनेच्या छायेत साजरा..
- भाविकांची वृक्ष वाचविण्यासाठी प्रशासनाला विनंती..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिखली (दि. ०५ डिसेंबर २०२५) :- चिखली परिसरातील स्पाईन रोड, घरकुल चौकाजवळील त्रिवृक्ष संगम दत्त मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही दत्तजयंती भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. मात्र यंदाचा उत्सव भाविकांसाठी वेदनेच्या सावटाखाली पार पडला.
गेल्या दहा वर्षांपासून वड, पिंपळ आणि औदुंबर या पवित्र त्रिवृक्षांच्या सान्निध्यात भक्तांची सेवा सुरू आहे. या वृक्षांच्या छायेत उभे राहिलेले छोटेसे दत्त मंदिर हे श्रद्धास्थान बनले होते. काही दिवसांपूर्वी न्यायालयाच्या आदेशानुसार परिसरातील अतिक्रमणे हटवताना मंदिर हटवण्यात आले. याबाबत नागरिकांनी कोणताही विरोध केला नाही, कारण मंदिराजवळ अनेक व्यावसायिक अतिक्रमणे होती.
तथापि, नागरिकांच्या म्हणण्यानुसार गेल्या दोन-तीन दिवसांत एका व्यापाऱ्याने स्वतःच्या फायद्यासाठी त्रिवृक्ष तोडण्याचा आणि दत्तमूर्ती हटवण्याचा दबाव वाढवला आहे. सेवकांवर दमदाटी केली जात असल्याचा आरोपही भाविकांनी केला. या त्रिवृक्षांचा परिसर सार्वजनिक असून, महावितरण व महापालिकेच्या अखत्यारित येतो, असे भाविकांचे म्हणणे आहे. मंदिर उभारण्यासाठी पूर्वी अधिकृत पत्रव्यवहारही झाल्याचे ते सांगतात.
वड, पिंपळ आणि औदुंबर हे हिंदू धर्मातील अत्यंत पूजनीय वृक्ष असून लाखो भाविकांच्या श्रद्धेचे प्रतीक आहेत. त्यामुळे त्रिवृक्ष वाचवण्यासाठी वृक्ष प्राधिकरण विभाग, शहर पोलीस तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने हस्तक्षेप करून वृक्षांचे आणि श्रद्धेचे रक्षण करावे, अशी मागणी भाविकांकडून करण्यात येत आहे.
“वृक्ष जगले तर श्रद्धा जिवंत राहील… गुरुदेव दत्त साक्षी आहेत,” असे नागरिकांनी भावनिक शब्दांत प्रशासनाला आवाहन केले.
















