- पाणीपुरवठा ते गोशाळा पिंपरी-चिंचवडमधील 10 विषयांवर लक्ष वेधले..
- राज्य सरकारकडून अपेक्षीत निधी, मान्यता अन् कार्यवाहीची मागणी..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि.११ डिसेंबर २०२५):- महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या भाजपा आमदार महेश लांडगे यांनी सभागृहात शहराच्या विकासासंदर्भातील 10 महत्त्वपूर्ण मुद्दे मांडत अक्षरशः “धमाका” उडवून दिला. शहराच्या सर्वंकष आणि शाश्वत विकासाशी निगडित असलेल्या विविध प्रकल्पांसाठी आवश्यक निधी व तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी त्यांनी ठामपणे केली. अधिवेशनाच्या पुरवणी मागणी सत्रामध्ये आमदार लांडगे ‘‘दस कदम आगे’’ असल्याचे पहायला मिळाले.
नागपूर येथे विधानसभेचे हिवाळी अधिवेशन आहे. अधिवेशनच्या तिसऱ्या दिवशी पुरवणी मागणी सत्र झाले. यामध्ये आमदार लांडगे यांनी विविध मागण्या केल्या. तसेच, सुमारे 35 लाख पिंपरी-चिंचवडकरांशी निगडीत विषय मार्गी लावण्यासाठी सकारात्मक व धोरणात्मक निर्णय घ्यावेत, अशी मागणी लावून धरली.
सभागृहात त्यांनी मांडलेल्या महत्त्वपूर्ण मागण्यांमध्ये पुढील मुद्द्यांचा समावेश होता. वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी निधी : शहरातील कचरा व्यवस्थापन सक्षम करण्यासाठी हा टप्पा अत्यंत आवश्यक असल्याचे लांडगे यांनी स्पष्ट केले. पवना व मुळा नदी सुधार प्रकल्पासाठी निधी : इंद्रायणी नदीच्या धर्तीवर व्यापक स्वच्छता व पर्यावरण सुधार यावर त्यांनी भर दिला. राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडी निर्बंधण्यासाठी उपाययोजना : आयटी व औद्योगिक पट्ट्यातील वाहतूक कोंडीमुळे उद्योगांवर परिणाम होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. मेट्रोच्या नवीन मार्गिकांना तातडीने मान्यता : हिंजवडी, वाकड, पिंपळे सौदागर, भोसरी, चाकण, निगडी, मोशी, वाघोली यांना जोडणाऱ्या तीन महत्त्वाच्या मार्गिका त्वरित मंजूर करण्याची मागणी. संविधान भवन व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या लायब्ररीसाठी निधी : भारतीय संविधान आणि विविध देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास केंद्र व्हावे. भारतीय संविधाने अमृत महोत्सवी वर्ष आपण साजरे करीत आहोत.त्यामुळे कामाला प्राधान्य द्यावे, असा मुद्दाही आमदार लांडगे यांनी अधोरेखित केला.
पवना बंद जलवाहिनी प्रकल्पाला गती द्या…
पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांच्या पाणी पुरवठ्यासाठी आवश्यक असलेला पवना बंद जलवाहिनी प्रकल्प स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन तातडीने काम सुरू करावा. तसेच, मुळशी आणि चासकमान धरणातून अतिरिक्त जलस्त्रोत व स्वतंत्र कोटा मिळावा. वाढत्या लोकसंख्येला आवश्यक पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी ठोस उपायांची मागणीही करण्यात आली. महावितरणचे स्वतंत्र मंडल कार्यालय : जलद सेवा आणि तक्रारनिवारणासाठी पिंपरी-चिंचवडमध्ये स्वतंत्र कार्यालयाची मागणी करण्यात आली. तसेच, गोशाळांसाठी उपक्रम : राज्यातील सर्व महापालिकांत भटक्या गोवंशासाठी गोशाळा अनिवार्य करण्याचा प्रस्तावही आमदार लांडगे यांनी मांडला. यासह मराठा समाजाच्या वारस नोंदींसाठी सकारात्मक निर्णय भाजपा महायुती सरकारने घ्यावी, अशी मागणी आमदार लांडगे यांनी सभागृहात केली.
“पिंपरी-चिंचवडच्या विकासाचा प्रत्येक मुद्दा मी सभागृहाच्या केन्द्रस्थानी ठेवला आहे. या शहराचा हक्काचा निधी मिळवून देणे ही माझी जबाबदारीच नव्हे, तर माझी वचनबद्धता आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी-चिंचवडला विकासाची नवी दिशा मिळाली आहे. वर्षानुवर्षे प्रलंबित प्रश्न मार्गी लागत आहेत. मला खात्री आहे. पुरवणी मागण्यांमध्ये मांडलेले सर्व विषय शहराच्या हितासाठी महत्त्वपूर्ण आहेत. भाजपा महायुती सरकारच्या काळात हे सर्व विषय मार्गी लागतील. संबंधित प्रकल्पांना लागणारा निधी, सुविधा आणि पायाभूत प्रकल्प निश्चितपणे पूर्णत्वास येतील.
– महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.

















