- सुरक्षा जाळी कापून गॅलरीतून जवानांनी फ्लॅटमध्ये केला प्रवेश, १५ मिनिटांत केले बचावकार्य पूर्ण..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि.११ डिसेंबर २०२५):- पिंपरी चिंचवड शहरातील निगडी प्राधिकरण भागातील एका सोसायटीमध्ये तिसऱ्या मजल्यावरील बंद फ्लॅटमध्ये अडकलेल्या तीन वर्षीय बालकाची पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या जवानांनी गॅलरीमधून फ्लॅटमध्ये प्रवेश करून सुरक्षित सुटका केली. मंगळवार (९ डिसेंबर) सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली.
निगडी प्राधिकरण येथील बाबर हेरिटेज सोसायटीमध्ये तिसऱ्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये तीन वर्षीय मुलगा अडकला होता. सोसायटीमधील नागरिकांनी त्याची सुटका करण्याचा प्रयत्न केला. परंतु फ्लॅटचा दरवाजा आतून बंद असल्याने त्यांना त्याची सुटका करण्यात यश आले नाही. अखेर नागरिकांनी महापालिकेच्या प्राधिकरण येथील उप-अग्निशमन केंद्राशी संपर्क करून घटनेची माहिती दिली. त्यानंतर घटनास्थळी अग्निशमन विभागाचे पथक दाखल झाले.
घटनास्थळी आढावा घेऊन अग्निशमन जवानांनी तातडीने बचावकार्यास सुरुवात केली. जवानांनी एक्सटेन्शन लॅडर लावून तिसऱ्या मजल्याच्या गॅलरीपर्यंत जाऊन गॅलरीवरील सुरक्षा जाळी कापून फ्लॅटमध्ये प्रवेश केला, व मुलाची सुखरूप सुटका केली. जवानांनी हे संपूर्ण बचावकार्य केवळ १५ मिनिटांत पूर्ण केले. उप अग्निशमन केंद्रातील जवान दिपक ढवळे, संभाजी अवतारे, संकेत थोरात, मनिष पाटील, सौरव इंगवले, अर्जुन चव्हाण यांनी ही कामगिरी केली.
दरम्यान, कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी अग्निशमन विभागाच्या १०१ या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडून करण्यात आले आहे.


















