न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि.१२ डिसेंबर २०२५) :- आम आदमी पार्टी पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने आगामी निवडणुकांच्या प्रचाराचा शुभारंभ मोरया गोसावी महाराज यांच्या मंदिरात विधिवत पूजा करून करण्यात आला. शहरातील महत्त्वाच्या धार्मिक स्थळांपैकी एक असलेल्या या देवस्थानातून प्रचाराला सुरुवात करून जनसेवेच्या कार्याला पवित्र प्रारंभ देण्यात आला.
यावेळी शहराध्यक्ष रविराज काळे यांनी सांगितले की आम आदमी पार्टी, पिंपरी चिंचवड शहर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींना संपूर्ण ताकतीने सामोरं जाणार आहे. आज श्रींच्या दर्शनाने या प्रचाराची सुरूवात झाली. आणि यासोबतच या पुढेही प्रत्येक प्रभागात जाऊन नागरीकांशी चर्चा करण्यासाठी आम्ही जनसंवाद यात्रा करणार आहोत.
आम आदमी पार्टीच्या आगामी निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात ही प्रभाग क्रमांक 18 मधील उमेदवार ॲड. सचिन पवार यांच्या प्रचारासोबत करण्यात आली. यावेळी पक्षाच्या कार्यकर्त्यांसह नागरिकांची उत्स्फूर्त उपस्थिती होती. स्थानिक प्रश्न, स्वच्छ प्रशासन आणि पारदर्शक कारभार या मुद्द्यांवर आम आदमी पार्टी दृढनिश्चयाने काम करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
प्रभागातील लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आणि जनहिताचे निर्णय प्राधान्याने घेण्यासाठी ॲड. सचिन पवार सज्ज असल्याचे पक्ष पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. प्रभाग 18 मध्ये स्वच्छ, प्रामाणिक आणि विकासाभिमुख राजकारणाचा नवा अध्याय लिहिण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. यासोबतच इथून पुढे आम आदमी पार्टीकडून आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण शहराच्या विकासासाठी प्रचार करण्यात येणार आहे.


















