न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि.११ डिसेंबर २०२५):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मोशी कन्याशाळेतील विद्यार्थिनी प्रतिक्षा लामटुरे हिने जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळवत सुवर्णपदक पटकावले आहे. पिंपरी चिंचवड शहर बॉक्सिंग असोसिएशनतर्फे दिवंगत फुलचंद यादव यांच्या स्मरणार्थ आयोजित चौथ्या जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत प्रतिक्षाने ही कामगिरी केली आहे. तिने या स्पर्धेत ‘बेस्ट बॉक्सर ऑफ द टूर्नामेंट’ हा पुरस्कार देखील पटकावला आहे.
केवळ चार महिन्यांच्या सरावानंतर प्रतिक्षाने स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी करीत जिद्द, मेहनत आणि खेळातील शिस्त दाखवत हे यश संपादन केले आहे. रिंगमध्ये दाखवलेली चपळता, अचूक पंचेस, प्रतिस्पर्ध्याच्या खेळाचे केलेले उत्तम विश्लेषण आणि आत्मविश्वास यामुळे तिने स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट कामगिरी करीत ‘बेस्ट बॉक्सर’ हा पुरस्कार मिळवला आहे.
महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, शिक्षण विभागाच्या उपायुक्त ममता शिंदे, प्रशासन अधिकारी संगीता बांगर, मोशी कन्याशाळेतील मुख्याध्यापक सुरेखा डांगे यांच्यासह शाळेतील शिक्षकांनी प्रतिक्षाचे अभिनंदन करून तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

















