न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ जून २०१९) :- चोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी लाचेची मागणी करून दहा हजारांचा पहिलो हप्ता स्वीकारणाऱ्या चिखली पोलिस ठाण्यातील एका कॉन्स्टेबलला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बेड्या ठोकल्या आहेत. दिलीप तुकाराम खंदारे (३५, चिखली पोलिस ठाणे, रा. दिघी रोड, भोसरी) असे अटक करण्यात आलेल्या लाचखोर पोलिस कर्मचा-याचे नाव आहे.
याप्रकरणी ५१ वर्षीय व्यक्तीने एसीबीकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार येथील भोसले ब्रदर्स पेट्रोल पंपासमोर ही कारवाई करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, चोरीच्या प्रकरणामध्ये तक्रारदाराच्या विरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी अटक करण्यात आलेल्या पोलिसाने ३० हजारांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती पंधरा हजार रुपये देण्याचे ठरले.
तक्रारदाराने याबाबत एसीबीकडे तक्रार दाखल केली. एसीबीच्या पथकाने खंदारे याला लाचेतील रकमेचा पहिला १० हजारांचा हप्ता स्वीकारताना अटक केली. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक प्रतिभा शेंडगे, पोलिस हवालदार नंदलाल गायकवाड, महिला कर्मचारी शिल्पा तुपे, प्रशांत वाळके यांच्या पथकाने केली.











