न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ जून २०१९) :- वाकड येथील कस्पटेवस्ती येथे बांधकाम साईटवर एका कामगाराच्या डोक्यावर ट्रॉली पडून मृत्यू झाला होता. याप्रकरणी संबंधित बांधकाम व्यावसायिकावर अद्याप गुन्हा दाखल झाला नाही. त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी बांधकाम कामगार सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत अध्यक्ष जयंत शिंदे यांनी कामगार उपायुक्तांना निवेदन दिले आहे.
निवेदनात नमूद केले आहे की, डायनेस्ट्री सोसायटीजवळ छत्रपती चौक, कस्पटेवस्ती, वाकड येथे दिलेराम शोकुराम यादव (वय ३४) यांच्या डोक्यावर ट्रॉली पडली. २९ मे २०१९ रोजी त्यांचा मृत्यू झाला होता. डोक्यात ट्रॉली पडून व क्रेन कोसळून अपघात होण्याचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत चालले आहे. मागील वर्षी पुणे जिल्ह्यात अकोला या गावी नदीजोड प्रकल्पाच्या ठिकाणी ९ कामगारांचा मृत्यू झाला होता.
हिंजवडीमध्ये एका कामगाराचासुद्धा क्रेन कोसळून मृत्यू व दोन कामगार गंभीर जखमी झाले होते. अशा प्रकरणांमध्ये बिल्डरवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्यानंतर ठेकेदार, सुपरवायझर यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. परंतु, ब-याच साईटवर मूळ मालकांवर गुन्हा दाखल केल्यास, अशा घटनांना आळा बसेल, अशी मागणी बांधकाम कामगार सेनेने केली.
बांधकाम कामगार सेनेने ७८ कामगारांच्या अपघाती मृत्यूबाबत कामगार उपायुक्तालयाला पत्र दिले होते. कामगार उपायुक्तालयाने ४० कामगार मृत्यू पावल्याचे उत्तर माहिती अधिकारात दिले आहे. त्यापैकी २० कामगारांचीच माहिती देण्यात आली आहे. इतर कामगारांची माहिती का दिली नाही, असा सवाल बांधकाम कामगार सेनेने केला आहे. किती कामगारांचा जीव गेल्यावर कारवाईचा बडगा उगारणार, असाही संतप्त सवाल बांधकाम कामगार सेनेने केला आहे.











