न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ जून २०१९) :- कंपनीमध्ये युनियनची स्थापना केल्यामुळे वेलमेड लॉकिंग सिस्टिम प्रा. लि. कंपनी व्यवस्थापनाकडून कामगारांची गळचेपी सुरू आहे. ७० कायमस्वरूपी कामगारांची चार वर्षापासून वेतनवाढ रखडली आहे. तर, २५ जणांवर बेकायदेशीर कारवाई करण्यात आल्याचा आरोप कामगार संघटनांनी केला आहे. या निषेधार्थ कामगारांनी ६ दिवसांपासून काम बंद आंदोलन पुकारले आहे. तसेच गेली ५७ दिवसांपासून साखळी उपोषण सुरू आहे.
गेल्या चार वर्षांपासून पगारवाढ झालेली नाही. दबाव आणून आंदोलन हाणून पाडण्याचा वारंवार प्रयत्न होत असल्याचा आरोप कामगार संघटनेने केला आहे. काही कामगार आडमुठी भूमिका घेत असल्याची माहिती कंपनी व्यवस्थापनाने पत्राद्वारे दिली. तीन वर्षे काही कर्मचा-यांच्या आडमुठी भूमिकेने कंपनीचे नुकसान झाल्याचे त्यात म्हटले आहे.
युनियनची स्थापना केल्यामुळेच आम्हाला त्रास दिला जात आहे. आमचीच वेतनवाढ रखवण्यात आली आहे. मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन चालूच राहील.
– गणेश पठारे, अध्यक्ष, वेलमेड लॉकिंग एम्प्लॉईज युनियन.न्यायालयाच्या आदेशानुसार वेतनवाढ देऊनही काही कर्मचा-यांनी ती नाकारली. ज्या विभागातील काम कमी झाले तेथील कर्मचारी कमी केले आहेत. तर, काहींवर बेशिस्त वर्तनामुळे कारवाई केली. कामगार उपायुक्त कार्यालयात व्यवस्थापन सकारात्मक चर्चा करण्यास तयार असूनही कामगारांनी सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. कामगारांचा संप बेकायदेशीर व असमर्थनीय आहे.
– आर. एस. थोरात, युनिट प्रमुख, वेलमेड लॉकिंग सिस्टिम प्रायव्हेट लिमिटेड.











