- पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड अंतर्गत उपक्रम
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ जून २०१९) :- पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड अंतर्गत पिंपळे सौदागर येथील कोकणे चौकात भूमिगत रस्त्यावर आधुनिक पद्धतीचे व्यापारी संकुल विकसित करण्यात येणार आहे. त्यामध्ये एकूण ५५ दुकाने, तसेच अनेक हातगाड्या विक्रेते असणार आहेत. त्यासाठी एकूण ४५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. स्मार्ट सिटी संचालक मंडळाच्या मान्यतेनंतर हा प्रकल्प राबविला जाणार आहे.
कोकणे चौकातून नियोजित रिंगरोडचा (एचसीएमटीआर) उड़ाणपूल असणार आहे. पुलाच्या खाली २०० मीटर बाय ३०० मीटर जागेत हे व्यापारी संकुल
उभारण्याचे नियोजन आहे. या हॉकर्स झोनमध्ये फुले फळे महिला प्रसाधने, केक शॉप इलेक्ट्रानिक गॅझेट शॉप, बुके आदी दूकानांचा समावेश असणार आहे. या हॉकर्स झोनच्या भागावर छत असणार आहे. त्यावरून रिंगरोडची वाहतूक होणार आहे. रस्त्याच्या खाली दुकानाचे गाळे असणार आहेत. एका दुकानाचा आकार २०० चौरस फूट असणार आहे. तसेच, हातगाडी विक्रेतेही असणार आहेत.एका कोप-यात आंतरराष्ट्रीय दर्जाच शॉपिंग कॉम्प्लेक्स असणार आहे. मध्यभागी कृत्रिम धबधबा, उद्यान व फुलझाडांच्या मदतीने सुशोभीकरण केले जाणार आहे.
या हॉकर्स झोनमध्ये उतरण्यासाठी सरकते जिने, असणार आहेत. या प्रकल्पाचा प्राथमिक आराखडा तयार करण्यात आला आहे. स्मार्ट सिटी संचालक मंडळाच्या बैठकीस या प्रकल्पास मंजुरी घेऊन पुढील कार्यवाही केली जाणार आहे. सदर व्यापारी संकुल दिल्ली पालिका बाजाराच्या धर्तीवर उभारले जाणार आहे. दुकानाचे गाळे भाड्याने द्यायचे की विकत या संदर्भात संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे. तसेच, संचालकांच्या सूचना व सल्ल्याचा अंतिम आराखड्यात समावेश केला जाणार आहे, अशी माहिती बीआरटीचे प्रवक्ते विजय भोजने यांनी दिली.











