न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ जून २०१९) :- पिंपरी चिंचवड शहरात विश्व हिंदू परिषदेच्या वतीने आयोजित शोभायात्रेत मुलींनी एयर गणचे ट्रिगर दाबून आवाज केले. तसेच विना परवाना तलवार मिरवल्या. या प्रकरणी निगडी पोलिस ठाण्यात २५० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. हा प्रकार रविवारी सायंकाळी पाच ते बाराच्या दरम्यान अकुंश चौक ते ठाकरे मैदान निगडी दरम्यान घडला होता.
याबाबत महिती देण्यासाठी आज मंगळवार (दि. ४ जून) रोजी चिंचवड येथे विश्व हिंदू परिषदेच्या कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा अध्यक्ष शरद इनामदार, जिल्हा कार्याध्यक्ष धनाजी शिंदे, जिल्हा मंत्री नितीन वाटकर, दुर्गवाहिनी प्रांत संयोजिका अॅड. मृणालीनी पडवळ, विजय देशपांडे, मिलिंद देशपांडे, अॅड. सतीश गोरडे आदी उपस्थित होते.
यावेळी शरद इनामदार म्हणाले की, युवतींच्या शारीरिक, मानसिक आणि बैद्धीक विकासासाठी देशभर मे महिन्यात सात दिवसीय दुर्गावाहिनी शौर्य प्रशिक्षण घेतले जाते. या प्रशिक्षण शिबिरात प्रशिक्षणार्थी युवतींची शोभायात्रा काढण्यात येते. दुर्गा मातेचे धार्मिक प्रतिक म्हणून खोटी तलवार या शोभायात्रेत युवतींच्या हातात असते. याचाच एक भाग म्हणून निगडी येथे २७ मे ते ३ जून या कालावधीत दुर्गावाहिनी शौर्य प्रशिक्षण शिबीर घेण्यात आले. या प्रशिक्षण शिबिराचा प्रमुख भाग असलेली शोभायात्रा २ जून रोजी काढण्यात आली. शोभायात्रेसाठी पोलिसांकडून रीतसर परवानगी काढण्यात आली. शोभायात्रेदरम्यान पोलीस बंदोबस्त देखील होता.
पूर्वग्रहदूषित असलेले पोलीस अधिकारी सतीश पवार आणि राजेंद्र निकाळजे हे दोन्ही अधिकारी शोभायात्रे दरम्यान उपस्थित होते. त्यांनी सुरुवातीपासून शोभायात्रेसाठी सहकार्य केले नाही. त्यांनी विश्व हिंदू परिषदेच्या अधिका-यांशी हुज्जत व वाद घातला. मुलींच्या हातात असलेली शस्त्रे खोटी आहेत, ती पोलिसांनी तपासण्याची परिषदेकडून विनंती केली. तरीही पोलिसांनी शस्त्रे तपासली नाहीत. ती शस्त्रे खरी असल्याची माहिती वरिष्ठ अधिका-यांना दिली आणि त्याआधारे खोटा गुन्हा दाखल केला.
हा गुन्हा सूडबुद्धीने दाखल केला आहे. या घटनेमुळे विश्व हिंदू परिषदेची संपूर्ण देशात बदनामी होत आहे. पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा काढून घ्यावा, अन्यथा पुढील आठवड्यात पोलीस आयुक्त कार्यालयात हजारोंचा मोर्चा नेण्यात येणार आहे. तसेच पुढील होणा-या घटनांना पूर्णतः पोलीस प्रशासन जबाबदार राहील, असेही इनामदार यांनी सांगितले.











