न्यूज पीसीएमसी नेटवर्क
आळंदी (दि. ५ जून २०१९) :- माउलींच्या पालखी सोहळ्याचे विसावे पंढरपूरला आषाढी वारीसाठी २५ जूनला जयघोषात मंदिरातील वीणा मंडपातून दुपारी चारच्या सुमारास प्रस्थान होणार आहेत. पालखी सोहळ्याचे अधिकृत वेळापत्रक देवस्थानने प्रसिद्ध करून, भाविकांना उपलब्ध करून दिले आहे.
१२ जुलैला आषाढी एकादशी आहे. पंढरपूरला या वर्षीच्या सोहळ्यात ६ दिवस मुक्कामी सोहळा विसावणार आहे. आळंदीला परतीचा प्रवास १७ जुलैला सुरू होईल. आळंदी मंदिरातून प्रस्थान झाल्यानंतर श्रींचा सोहळा एक दिवस मुक्कामास आजोळ घरी नवीन दर्शनबारी मंडपात समाज आरतीने विसावेल. आळंदीत पाहुणचारानंतर २६ जूनला सोहळा दोन दिवसांच्या मुक्कामासाठी आळंदीतून पहाटे सहाच्या सुमारास निघेल. २६ व २७ जूनला पुण्यात स्वागत व पाहुणचार होईल. पुण्यनगरीतून श्रींचा सोहळा २८ जूनला सासवडकडे रवाना होईल.
यावर्षी सोहळा एकादशीला पुण्यातून न निघता दशमीच्या दिवशी निघणार आहे. तिथीप्रमाणे २८ जूनला सासवडला पोहाचणार आहे.एकादशीला फराळ वाटपाऐवजी अन्नदान प्रसादाचे वाटप करण्यास पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर पवार यांनी पुणे ते सासवड या प्रवासात मंडळे, सेवाभावी संस्था आणी दानशूर व्यक्तींनी भाविकांना आवाहन करून,सोहळ्यातील दशमी साजरी करावी, असे सांगितले आहे. १२ जूलैला पालखी सोहळा पंढरीत जयघोषात एकादशी साजरी करणार आहे.















