- कार्यकर्ते आणि नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग..
- मुस्लिम तरुणांचा जाहीर पाठिंबा; २५ फुटी भव्य हार घालून जल्लोषात स्वागत…
संतोष जराड :- प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
काळेवाडी (दि. ३० डिसेंबर २०२५) :- पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीचे ढोल वाजू लागल्याने प्रभाग क्रमांक २२ काळेवाडीत भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार विनोद नढे यांचा प्रचार जोरदार रंगत आहे. सोमवारी सकाळपासून रात्रीपर्यंत घराघरांत जाऊन मतदारांशी संपर्क साधला जात असून कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे.
ज्योतिबानगर, मातृछाया कॉलनी, सुर्यकिरण कॉलनी, चंद्रकिरण कॉलनी आणि समता कॉलनी परिसरात झालेल्या प्रचारफेरीत मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले. स्थानिक महिलांनीही प्रचारात उत्साहाने सहभाग घेतला. रस्तोरस्ती घोषणाबाजी, भेटीगाठी आणि जनसंवादातून मतदारांपर्यंत पक्षाच्या भूमिका आणि कामांची माहिती पोहोचविण्यात आली.
विशेष म्हणजे, हनिफ आणि सामील ग्रुपसह अनेक मुस्लिम तरुणांनी काळेवाडीच्या विकासासाठी भाजप उमेदवार विनोद नढे यांना जाहीर पाठिंबा जाहीर केला. “विकास आणि मूलभूत सुविधा हाच आमचा मुद्दा” असा संदेश देत या तरुणांनी उमेदवारांच्या प्रचारात सक्रिय सहभाग सुरू केला आहे. या पार्श्वभूमीवर झालेल्या कार्यक्रमात उमेदवारांचे २५ फुटी भव्य-दिव्य हार घालून जल्लोषात स्वागत करण्यात आले.
प्रचारादरम्यान नागरिकांनी रस्ते, पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्था, उद्याने, क्रीडासुविधा आणि सुरक्षिततेचे मुद्दे पुढे मांडले. या सर्व तक्रारी व सूचना लक्षात घेऊन नढे यांनी आगामी काळात ठोस उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. “काळेवाडीचा सर्वांगीण विकास आणि सर्व समाजघटकांना समान न्याय” अशी हमी देत त्यांनी मतदारांशी थेट संवाद साधला.












