न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ जून २०१९) :- गेल्या काही दिवसांपासून वाकड परिसरात पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने ड्रनेज लाईन टाकण्याचे काम सुरू आहे. मंगळवारी सकाळी म्हातोबा चौकातील रिध्दिसिध्दी सोसायटीजवळ लाईन टाकण्यासाठी खोदाईचे काम सुरू होते.
ज्या ठिकाणी हे काम सुरू होते, त्याच ठिकाणी एमएनजीएलची पाइपलाइन आहे. जेसीबीच्या साहाय्याने खोदाई करत असताना, या पाइपलाइनला धक्का लागून, त्यातून गॅसची गळती सुरू झाली. एमएनजीएलच्या अधिका-यांना गॅस पाइपलाइन फुटल्याचे समजताच त्यांनी तातडीने गॅसचा पुरवठा
खंडित केला. त्यानंतर एमएनजीएलच्या वतीने तात्काळ दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले.
दरम्यान या घटनेने वाकड आणि पिंपळे सौदागर परिसरातील चाळीस ते पन्नास सोसायट्यांमधील सुमारे पन्नास हजार कुटुंबीयांचा गॅस पुरवठा चार तास खंडित झाला होता. यामुळे या परिसरातील नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला.











