न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ जून २०१९) :- पिंपरीतील प्रभाग क्रमांक १९ मधील विसडम पार्क व शांग्रीला हाऊसिंग सोसायटी परिसरात गेल्या चार वर्षांपासून समस्या आ-वासून उभ्या आहेत. याबाबत स्थानिक नागरिकांनी वेळोवेळी समस्या सोडविण्याची मागणी केली. परंतु,प्रशासनाने त्यांना दाद दिली नाही.
स्थानिक नगरसेवक शैलेश मोरे यांनीही या समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाकडे वेळोवेळी अर्ज विनंत्या केल्या. महापालिकेच्या सर्वसाधरण सभेतही आवाज उठविला परंतु, ढिम्म प्रशासनाला काही केल्या जाग आली नाही. शेवटी मंगळवार (दि. ४ जून) रोजी नगरसेवक शैलेश मोरे यांनी विसडम पार्क व शांग्रीला हाऊसिंग सोसायटीतील रहिवाशी यांच्याबरोबर महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांचे दालन गाठले व त्यांची भेट घेतली.
तसेच त्यांना रहिवाश्यांच्या वतीने निवेदन देत, मागिल ४ वर्षांपासून रेंगाळलेला प्रलंबित नविन रस्त्याचा प्रश्न व परिसरातील इतर समस्या निकालात काढण्यासाठी जातीने लक्ष देण्याची विंनतीवजा मागणी केली.
आयुक्त हर्डीकर यांनीही लवकरात लवकर कामे सुरु करण्याचे आश्वासन नगरसेवक शैलेश मोरे व रहिवाश्यांना यावेळी दिले. यावेळी नगरसेवक शैलेश मोरे व दोन्ही सोसायटीतील रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.













