न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ जून २०१९) :- पर्यावरणाच्या संवर्धनासाठी निगडी येथील “अर्थबीट” संस्थेच्या वतीने पाषाण टेकडीवर साडेतीन हजार बिजगोळे (सीडबॉल) टाकून वृक्षारोपण करण्यात आले. सीडबॉल द्वारे वृक्षारोपण करून पर्यावरण दिन साजरा करण्यात आला.
यावेळी मराठा चेंबर ऑफ़ कॉमर्स इंडस्ट्रीज ॲंड ॲग्रिकल्चरल च्या पर्यावरण विभाग प्रमुख धनश्री हरिदास, जीवित नदी फाउंडेशनच्या संचालिका शैलजा देशपांडे, अर्थबीटच्या संचालिका प्रा. प्राजक्ता नरुटे व चैताली देशपांडे, एशियन मशीन टूल्सचे संचालक राहुल नरुटे, बांधकाम व्यावसायिक संदीप शितोळे आदी उपस्थित होते.
कचरा व्यवस्थापनात स्थिरता, महिला सशक्तीकरण, पर्यावरण संवर्धन या त्रिआयामी संकल्पनेतून विविध उत्पादनांची निर्मिती केली जाणार आहे. कंपोस्ट खत आणि रद्दीपासून सीडपेपर (बिया असलेला कागद) जैवीक कचरा व गोठ्यातील शेण वापरून सीडबॉल, सॅंपलिंग कप, प्लॅस्टिकविरहीत कुंडी (पॉट) या पर्यावरणपूरक वस्तूंची निर्मिती केली जाईल.
टाकवू पेपरपासून तयार केलेल्या पर्यावरण पूरक पेपरमध्ये बियांचा समावेश करून सीड पेपर तयार केला. तसेच जमिनीवरचे विघटन होणाऱ्या पर्यावरण पूरक घटकामंध्ये बियांचा समावेश करून आकर्षक असे सीडबॉल तयार केलेत. हे सीडबॉल कुठेही जमिनीवर ठेवल्यास पाण्याच्या संपर्कात आल्यास त्यापासून रोपटे तयार होते. ६ महिने टिकणारे हे सीडबॉल १५ दिवस पाण्याशिवाय राहू शकतात. पेपर व बॉल मध्ये ५ /६ बियाचा समाविष्ट केलेल्या आहे. या उत्पादनांचा व्यक्तिगत भेट किवा कॉर्पोरेट गिफ्ट देण्यासाठी वापरला जावू शकतो. या उपक्रमातून महिला बचत गटांच्या माध्यमातून महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा मानस असल्याचे प्रा. नरुटे व देशपांडे यांनी व्यक्त केला आहे.













