न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ जून २०१९) :- रिक्षा चालकाने रस्त्याच्या कडेला सापडलेले ५० हजार रुपये आणि महत्त्वाची कागदपत्र पोलिसांच्या मार्फत मूळ मालकांपर्यंत पोहचते केल्याचा प्रकार सांगवीत घडला. जितेंद्र मनोहर गायकवाड असे या रिक्षा चालकाचे नाव असून त्यांनी नुकताच एक महिन्यापूर्वी रिक्षा विकत घेऊन व्यवसाय सुरू केला होता.
महेश कोळी हे टॅक्स ऑफिस मध्ये कामाला असून अभय नरवडे यांनी त्यांना कर भरण्यासाठी ५० हजार रुपये दिले होते. महेश हे पैसे घेऊन ऑफिसला दुचाकीवरून पिंपळे गुरव वरून कार्यालयात जात होते. तेव्हा सोबत असलेले पैसे पीडब्ल्यूडी मैदानाशेजारी पडले. ते पैसे रिक्षा चालक गायकवाड यांना रस्त्याच्या कडेला पिवळ्या पिशवीत सापडले. मंगळवारी ही घटना घडली.
दरम्यान, रिक्षा चालक गायकवाड यांनी ते पैसे परत करण्यासाठी आज (बुधवारी) सकाळी सांगवी पोलीस ठाणे गाठत ५० हजार रुपये रोख रक्कम आणि महत्त्वाची कागदपत्रे पोलिसांकडे दिली. तेवढ्यात योगा योगाने महेश काळे आणि मूळ मालक अभय हे सांगवी पोलिसात पैसे हरवल्याची तक्रार देण्यासाठी आले होते. पोलिसांनी तात्काळ त्यांचेच पैसे आहेत का याची पडताळणी करून संबंधित मूळ मालकाला पैसे परत केले. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभाकर शिंदे, पोलीस उपनिरीक्षक पन्हाळे, कर्मचारी बोऱ्हाडे यांनी रिक्षा चालक जितेंद्र गायकवाड यांना पुष्प गुच्छ देऊन सत्कार केला.













