न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ६ जून २०१९) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने ‘वायु प्रदूषणावर मात’ या अभियानांतर्गत शहरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. विविध भागांत प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्या दुकानदारांवर बुधवारी (दि. ५) रोजी कारवाई करण्यात आली.
एका दिवसात तब्बल १ लाख ५ हजारांचा दंड वसुल करण्यात आला. तसेच अस्वच्छता करणाच्या नागरिकांना एकूण २६ हजार १८० रूपयांचा दंड करण्यात आला. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पालिकेतर्फे ही मोहिम राबविण्यात आली. शहरातील वेगवेगळ्या भागात स्वच्छता अभियान राबवून परिसर स्वच्छ करण्यात आला. पालिकेच्या आरोग्य कर्मचा-यांसह सामाजिक कार्यकर्ते व स्वयंसेवकांनी यात सहभाग घेतला. या वेळी कचरा न जाळण्याचे आवाहन करण्यात आले.
प्लास्टिकबंदी अंतर्गत शहरातील एकूण २२० दुकानांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी १९ दुकानदारांकडून १ लाख ५ हजारांचा दंड वसूल करण्यात आला. त्यामध्ये एम्पायर इस्टेट, चिंचवड येथील एका प्रसिद्ध सराफी दुकान, थेरगाव येथील जतिम महराज ट्रेडर्स यांच्याकडे दुस-यांदा प्लास्टिकच्या पिशव्या आढळल्याने त्यांना प्रत्येकी १० हजारांचा दंड करण्यात आला.
त्यांनी पुन्हा प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर केल्यास संबंधित व्यापा- यांना १५ हजार रुपये दंड आणि ३ महिने कारावासाची शिक्षा करण्याची कायद्यात तरतूद आहे. त्यानुसार कारवाई केली जाईल, असे पालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय यांनी सांगितले. या मोहिमेत सर्व क्षेत्रीय अधिकारी, सहायक आरोग्याधिकारी, मुख्य आरोग्य निरीक्षक, आरोग्य निरीक्षक व कर्मचारी सहभागी झाले होते.













