न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ६ जून २०१९) :- पिंपरी चिंचवड शहरात अनेक भागांत पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. हाउसिंग सोसायट्यांना पालिकेच्या टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. मात्र, खासगी अवैध टँकरवाले त्यांना दमदाटी करून अटकाव करीत आहेत. परिणामी, हाउसिंग सोसायट्यांना “जास्त दराने पाणी घ्यावे लागत आहे. सदर अवैध टँकर लॉबीवर कारवाई करावी, अशी मागणी भाजपचे नगरसेवक तुषार कामठे यांनी केली आहे.
त्यांनी पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यासह आरटीओ व पोलिस आयुक्तांकडे तक्रार केली आहे. शहरात टँकरवाल्यांचा धंदा जोरात आहे. हे टँकरवाले सोसायट्यांकडून अवाजवी पैसे आकारून पाणीपुरवठा करतात, बांधकामासाठी बोअरवेलचे पाणी किंवा ईतर ठिकाणचे पाणी घेतात, त्याच टँकरने नागरिकांना पिण्याचे पाणी पुरविले जाते. त्यामुळे आरोग्यास धोका निर्माण झाला आहे, अशी तक्रार कामठे यांनी केली आहे.
सदर टँकर लॉबीचे लोक महापालिकेच्या टँकरने नागरिकांना पाणीपुरवठा करू देत नाहीत. पालिकेच्या टँकरचालकास किंवा मालकास तसेच, पाणीपुरवठा अधिका-यांना दमदाटी केली जाते, असा आरोप कामठे यांनी केला आहे. तसेच, अनेक टँकरवाले टँकरचा कर भरत नाहीत. अनेक टँकरचा विमा काढलेला नसतो. काही टँकरचे फिटनेस सर्टिफिकेट नसते. त्यामुळे या अवैध टँकरचालकांवर कारवाई करावी, अशी मागणी कामठे यांनी या तक्रारीत म्हटले आहे.













