- चुरशीच्या लढतीत राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविकेचा केला पराभव…
अशोक लोखंडे :- संपादक तथा प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १९ जानेवारी २०२६) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक २२, काळेवाडी येथे अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीत भारतीय जनता पार्टीच्या नवख्या व तरुण उमेदवार कोमल सचिन काळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेविका उषा दिलीप काळे यांचा ६७३ मतांनी पराभव करत दणदणीत विजय मिळवला.
या विजयानंतर बोलताना सचिन काळे यांनी सांगितले की, गेली अनेक वर्षे कोणतेही पद नसताना त्यांनी व त्यांच्या पत्नी कोमल काळे यांनी प्रभागात विविध समाजोपयोगी उपक्रम राबवले. नागरिकांच्या मूलभूत हक्कांसाठी दिवस-रात्र प्रयत्न करून त्यांच्या समस्या सोडवण्यावर भर दिला. कोणतीही अपेक्षा न ठेवता निस्वार्थपणे केलेल्या या समाजसेवेचेच हे फळ असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
भारतीय जनता पार्टीने उमेदवारी देऊन जो विश्वास दाखवला, त्याबद्दल त्यांनी आमदार शंकर जगताप तसेच पक्षातील सर्व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. त्यांच्या पाठिंब्यामुळे व जनतेच्या विश्वासामुळेच हा विजय शक्य झाल्याचे त्यांनी नमूद केले.
निवडणूक जिंकल्यानंतर पुढील काळात प्रभागातील पायाभूत सुविधा, नागरी सोयी-सुविधा, स्वच्छता, आरोग्य व विकासकामांसाठी शंभर टक्के प्रयत्न करण्याचा निर्धार कोमल सचिन काळे यांनी व्यक्त केला. नागरिकांचे जीवनमान उंचावणे हेच आपले प्रमुख ध्येय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.












