न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ६ जून २०१९) :- महामेट्रोने कामाचा ठेका दिलेल्या मे. एचसीसी-अल्फराइन्फा प्रोजेक्ट प्रा. लि. या संस्थेने कामगांरांचे मासिक पगार व पीएफ माहे डिसेंबर २०१८ ते आजपर्यंत दिलेला नाही. तसेच काही कामगारांना कामावरून निलंबितही करण्यात आले आहे. याच्या निषेधार्थ कामगार व कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर तसेच, शहरातील काही सामाजिक संघटनांनी प्रसिद्धीपत्रक काढून, ठेकदार, मेट्रोचे अधिकारी यांच्याविरोधात कामगारांनी मोर्चा व आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, एचसीसी अलफारा इन्फ्राप्रोजेक्ट या मेट्रो स्टेशनची उभारणी करणा-या कंपनीमध्ये सुमारे १०० कामगार कर्मचारी काम करतात. महामेट्रो रेल प्रोजेक्टचे ठेकेदार अल्फा़ इन्फ्राप्रोजेक्टच्या वल्लभनगर येथील कार्यालयाच्या समोर आपल्या हक्काच्या पगारासाठी १ जूनपासून आमरण उपोषण सुरु केले आहे. या कंपनीने १०० कामगारांना सहा महिन्यापासून पगार न देता केवळ एक दोन महिन्याचा पगार देऊन या कामगारांना हाकलून देण्याचा प्रयत्न झाला, त्यावेळी म्हणजे १ मे रोजी या कामगारांना उपोषण आंदोलन करायला लावले. ३ मे रोजी या कामगारांना ३५ लाख रु दिले, उर्वरीत थकित ९० लाख रु. कामगारांची पगाराची रक्कम देण्यासाठी पुन्हा उपोषण सुरू झाले आहे.
सबंधीत ठेकेदार, मेट्रो, प्रशासनाने कुठलीही दखल घेतली नाही. त्यामुळे सबंधीत ठेकदार, मेट्रोचे अधिकारी यांच्यावर आथिर्क अफरातफर, विश्वासघात, फसवणूक बाबत पिपरी पोलिसस्टेशन चिचवड स्टेशन येथे तक्रार दाखल केली आहे. आज दापोडी येथे पिंपरी सुरु असणा-या मेट्रो प्रकल्पाच्या स्थळी जाऊन तेथील कामगारांना या फसवणुकीबाबत जनजागृती पत्रके वाटप करुन जनजागृती करण्यात आली.
आज उपोषणाचा सहावा दिवस असून महामेट्रो व संबंधींत ठेकेदारांने हे आंदोलन गांर्भीयाने घेतले नसल्याने शुक्रवार दि. ७ जून सकाळी ११ वाजता महामेट्रो कार्यालय फुगेवाडी जकात नाका येथे मोर्चा आंदोलन होणार आहे. तर सोमवार दि. १० जून सकाळी ११ वाजता कामगार आयुक्त कार्यालय स्वारगेट या कार्यालयात कामगारांचे आंदोलन होणार आहे. तरी शहरातील संघटीत असंघटीत कामगार व सामाजिक संस्थांनी यामध्ये सामील व्हावे, असे आवाहन मारुती भापकर, डॉ. सुरेश बेरी, सचिन देसाई, प्रभाकर माने, अभिजीत भास्करे, सुजित चव्हाण, केदार घाटपांडे, कृष्ण कुमार, स्मृती शिंदे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.














