न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ६ जून २०१९) :- पिंपरी चिंचवड शहर विकास आघाडीच्या माध्यमातून शहरातील महिलांना सामूहिक व्यवसाय निर्मितीसाठी प्रयत्न होताना दिसत आहेत. याचाच एक भाग म्हणून आज गुरुवार (दि. ६ जून) रोजी महिलांसाठी सामूहिक व्यवसाय व महिलांनी बनविलेल्या खाद्यपदार्थ वस्तूंच्या स्टॉलचे अध्यक्ष अभय भोर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना भोर म्हणाले की, ”पिंपरी चिंचवड शहर हे उद्योगांचे माहेरघर आहे. औद्योगिक शहर असल्यामुळे महिलांना शहरात व्यवसायाच्या मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध आहेत. परंतु, या सर्वांना मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. महिला समूहांना एकत्रित करून, सामूहिक उद्योग सुरू करण्याचे आघाडीचे प्रयत्न सुरू आहेत. यातील अनेक महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी रोजगार उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात बेकारीवर मात करण्यात यश मिळत आहे.

पुणे शहर, पिंपरी चिंचवड व जिल्ह्यातील अनेक भागात लवकरच महिला व्यवसायिकांनी बनवलेल्या खाद्यपदार्थांची विक्री व्यवस्थेची साखळी निर्माण करण्यात येणार आहे. यामध्ये अनेक प्रकारचे व्यवसाय सुरू करण्यात येणार असून, महिलांना व तरुणांना शासकीय योजनेचा लाभ देऊन, खऱ्या अर्थाने स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया व महिला सक्षमीकरणाचा लाभ घेता येईल”.
यावेळी पिंपरी चिंचवड उद्योग आघाडीच्या माधुरी गुरव, दीपाली जाधव, ज्योती पवार, तसेच माजी नगरसेविका कांता मोंढे, विद्युत समिती सदस्य मधुकर बच्चे, भाजप युवा मोर्चा अध्यक्ष कोमल काळभोर, शंकर शेळके, सदाशिव पाटील, अण्णा गुरव, काकासाहेब देशमुख व मोठ्या प्रमाणावर महिला वर्ग उपस्थित होता.














