न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ जून २०१९) :- महापालिकेच्या वतीने शहरातील थेरगाव, चिखली, चिंचवड, रावेत, किवळे, पुनावळे, ताथवडे, मामुर्डी, मोशी व बो-हाडेवाडी या १० ठिकाणी टीपी (टॉऊन प्लानिंग) स्किम राबविण्यात येणार आहे. या योजनेतून चऱ्होली व डुडुळगाव उपसूचना देऊन वगळण्यात आले आहेत. पालिकेची सर्वसाधारण सभा गुरुवारी (दि. ६) रोजी झाली.
शहराचा मंजूर डीपी स्किमनुसार विकास केला जाणार आहे. त्यानुसार एचसीपी कन्सल्टंट आराखडा तयार करणार आहे. या योजनेत शहरातील १२ भागांचा समावेश करण्यात आला होता, त्यातील चऱ्होली व डुडुळगाव भागातील टीपी स्किम राबविण्यास माजी महापौर नितीन काळजे यांनी विरोध केला. पालिकेत १९९७ ला समाविष्ट गावांचा समावेश झाला आहे. त्यामध्ये अनेक शेतक-यांच्या जमिनी गेल्या आहेत. पुन्हा टीपी स्किम राबविल्यास असंख्य शेतकरी बाधित होतील. त्यामुळे त्यांनी चऱ्होली व डुडुळगाव यातून वगळण्याची सूचना केली.
शहरातील उर्वरित भागातील काही ठिकाणचा समावेश करण्याची उपसूचना नामदेव ढाक यांनी माडली. त्या दोन्ही उपसूचनासह या विषयाला महापौरांनी मंजुरी दिली. या विषयाबाबत सविस्तर सादरीकरणाची मागणी मनसेचे गटनेचे सचिन चिखले यांनी केली.
या स्किममुळे बाधित जमीनमालकावर अन्याय होणार आहे. स्थानिक नगरसेवकांना विश्वासात घेतल्याशिवाय ही योजना लागू करू नये, असे शिवसेनेचे राहल कलाटे म्हणाले.
भाजपचे संदीप वाघेरे यांनी नदी सुधार योजनेत खोलीकरण केल्याने रेषा कमी होणार असल्याचा दावा केला. नदी सुधारसाठी काढलेले कर्जरोखे त्याच योजनेसाठी तसेच, टीपी स्किम एका मोठ्या कंपनीमार्फत राबविण्याची सूचना केली.
या योजनेत छोटा आकाराच्या जमीन मालकांना अभय द्यावे, अशी सूचना सीमा साळवे यांनी केली. भाजपचे अभिषेक बारणे यांनी या योजनेचे स्वागत केले. ज्या नगरसेवकांना ही योजना हवी आहे, तेथे अंमलबजावणी करावी, असे आदेश महापौर जाधव यांनी आयुक्तांना दिले.














