न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ जून २०१९) :- पुनावळे येथील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वाहतूक पोलीस आणि वॉर्डनची कायमस्वरूपी नियुक्ती करा, अशी मागणी शिवसेनेच्या नगरसेविका रेखा दर्शिले यांनी केली आहे. याबाबत त्यांनी मंगळवारी (दि. ४) रोजी उपायुक्त विनायक ढाकणे यांच्याकडे निवेदन दिले आहे.
मागील काही वर्षांपासून पुनावळे परिसरातील रहदारीत वाढ होऊ लागली आहे. पुनावळेच्या हद्दीत टोलेजंग इमारती उभारल्याने भागाच्या लोकसंख्येमध्ये झपाट्याने वाढ होऊ लागली आहे.
पिंपरी चिंचवड, पुणे आणि मुंबईच्या दिशेने पुनावळेमध्ये येणा-या वाहनांच्या संख्येमध्येदेखील मोठी वाढ झाली आहे. मुंबई महामार्गावरील भुयारी मार्गात दररोज होणारी वाहतूक कोंडी स्थानिकांची डोकेदुखी ठरू लागली आहे. त्यामुळे वाहतुकीचे नियमन करण्यासाठी वाहतूक पोलिस आणि व वॉर्डनची नियुक्ती करण्याची मागणी दर्शिले यांनी केली आहे.


















