न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिखली (दि. ७ जून २०१९) :- चिखली परिसरातून कुदळवाडीमार्गे पवार वस्ती, मोरे पाटील चौक, केएसबी, मोरवाडी चौक ते मनपा, पिंपरीगांवाकडे जाणाऱ्या पीएमपीएलच्या बसची फेरी पीएमपीएल प्रशासनाने कोणतीही पूर्वसूचना न देता गेल्या काही दिवसांपासून बंद केली आहे.
त्यामुळे कुदळवाडी परिसरातील विद्यार्थी, जेष्ठ नागरिक, दूध व्यावसायिक, भाजीपाला विक्रेते व नागरिकांना नाहक मनस्ताप होत आहे. कुदळवाडीतून पिंपरी चिंचवड शहरात नोकरी-व्यवसायास जाणाऱ्या नागरिकांची यामुळे तारांबळ उडाली आहे. मनपाच्या बसची फेरी बंद झाल्यामुळे खाजगी वाहन चालकांची मात्र चंगळ होत आहे.
बस वाहतुकीचा मार्ग बदलण्याचे अधिकार नसतानाही ऐकीव गोष्टीवर विश्वास ठेवून आपण या परिसरातील बसचा मार्ग बदलला आहे. आपण तात्काळ शाळा सुरु होण्या अगोदर, चिखली परिसरातून कुदळवाडीमार्गे जाणाऱ्या बसची फेरी सुरु करावी. अन्यथा कुदळवाडी परिसरातील नागरिकांच्या वतीने आपल्या कार्यालयावर आंदोलन छेडण्यात येईल, असे स्वी. नगरसेवक दिनेश यादव यांनी पीएमपीएल व्यवस्थापनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.


















