- कचरा उचलण्याकामी आयुक्तांनी ठेकेदारांना दिलेली मुदतवाढ संशयाच्या भोवऱ्यात
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ जून २०१९) :- पिंपरी चिंचवड शहरातील घरोघरीचा कचरा एकत्र करुन तो मोशी कचरा डेपोपर्यंत वाहून नेणे या कामाच्या निविदा बी. व्ही. जी. व ए. जी. एन्व्हायरो या कंपन्यांना कामाचे आदेश दिलेले आहेत. सदरचे काम जूनपासून सुरु होणार होते. पण संबंधित ठेकदारांनी काम चालू केले नाही. याबाबत विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी आयुक्तांना निवेदन दिले आहे.
यात त्यांनी म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाने क्र. आमुका/ ३ /कावि ३०१/२०१९ दिनांक २७ / ५ / २०१९ अन्वये बी. व्ही. जी. व ए. जी. एन्व्हायरो या दोन्ही ठेकेदारांना नोटीस बजावण्यात आलेली आहे. सदर नोटीसीमध्ये करारनाम्यातील अट क्र. ३४ (बी) नुसार करारनामा रद्द करण्याची कार्यवाही करण्यात येईल, असे म्हटले आहे.
परंतु, दिनांक २८ / ५ / २०१६ रोजी आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये अति आयुक्त. क्षेत्रिय अधिकारी, आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी व संबंधित कंपन्याचे प्रतिनिधी उपस्थिती होते. या बैठकीतील निर्णयानुसार ठेकेदारांकडील वाहनांची असलेली अनुपलब्धता लक्षात घेता, त्यांना एक महिना मुदतवाढ देण्यात आली आहे. सदरचे काम दि.१ जुलैपासून सुरु करणार आहेत.
या निर्णयामुळे काही प्रश्न निर्माण होतात कामाचे आदेश दिल्यानंतर जास्तीत जास्त ९० दिवसात काम चालू करण्याची अट आहे. ती भंग होत नाही का? ९० दिवासांचे आत कामकाज सुरुवात करणे आवश्यक असल्याचे ज्ञात असतानाही संबंधितांनी मुदतवाढीकरीता विनंती करणे बेकायदेशीर नव्हे काय? सदर ठेकेदारांकडे करारनामा अट क्र. २३ (ए) (के) अन्वये वाहने उपलब्ध आहेत काय? एका महिन्यात हे वाहन उपलब्ध करुन देणार का? वाहने उपलब्ध नाही झाली तर प्रशासन काय करणार? तसेच करारनाम्यातील अट क्र. ३, ४ (बी) अन्वये करारनामा रद्द करण्याची कार्यवाही प्रस्तावित केली आहे काय? आपणांस विनंती आहे की, वरील सर्व प्रश्नांची सविस्तरपणे उत्तरे देण्यात यावीत. तसेच सदरचे हे काम चालू करण्याबाबत चालढकल करीत असल्याचे सिध्द होत असल्यामुळे नियमाप्रमाणे अट ३३ (बी) अन्वये करारनामा रद्द करुन नव्याने निविदा प्रसिध्द करण्यात यावी, असे साने यांनी या निवेदनात म्हटले आहे.


















