- २८ फेब्रुवारीनंतर अर्जदारांना मुंबई गाठावी लागणार…
संतोष जराड, प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि.२४ फेब्रुवारी २०२६):- पिंपरी-चिंचवडमधील आकुर्डी येथे कार्यरत असलेले राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग (केंद्रीय अनुसूचित जाती आयोग) यांचे प्रादेशिक कार्यालय कायमस्वरूपी मुंबई येथे हलविण्यात आले असून, २८ फेब्रुवारी हा येथील कार्यालयाचा अखेरचा कामकाजाचा दिवस ठरणार आहे. त्यानंतर आकुर्डी येथील कार्यालय पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे.
आकुर्डीतील केंद्रीय सदन इमारतीच्या तळमजल्यावर हे कार्यालय अनेक वर्षांपासून सुरू होते. १९८३ मध्ये केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अखत्यारित पुण्यातून या कार्यालयाची सुरुवात झाली होती. पुढे २००६ मध्ये कार्यालय आकुर्डी येथे स्थलांतरित करण्यात आले. राज्यभरातील तक्रारदारांसाठी हे ठिकाण सोयीचे मानले जात होते.
ग्रामपंचायत, नगरपालिका, महापालिका, राज्य व केंद्र सरकारच्या विविध विभागांबाबत तसेच पोलिस प्रशासनाविरोधात येणाऱ्या तक्रारी येथे दाखल होत असत. दिवाणी व फौजदारी स्वरूपाच्या अनेक प्रकरणांमध्ये नागरिक येथे दाद मागत असत.
दोन महिन्यांपूर्वी कार्यालयीन कामकाजाची संपूर्ण यंत्रणा मुंबईकडे वळविण्यात आली. अधिकारी व कर्मचाऱ्यांचीही तेथे बदली करण्यात आली असून, पूर्वी कार्यरत असलेल्या १२ पैकी काही अधिकारी मुंबईत रुजू झाले आहेत. सध्या आकुर्डी येथे केवळ तक्रार अर्ज व टपाल स्वीकारण्याचे काम मर्यादित स्वरूपात सुरू होते.
नागरिकांना माहिती मिळावी यासाठी काही कालावधीची मुदत देण्यात आली होती. मात्र, २८ फेब्रुवारीपासून येथे टपाल स्वीकारणेही थांबविण्यात येणार असून कार्यालयाला कुलूप लागणार आहे. त्यामुळे पुढील सर्व कामकाजासाठी अर्जदारांना मुंबई येथील कार्यालयाशी संपर्क साधावा लागणार आहे.











