- पैशाच्या वादातून २४ वर्षीय युवकाचा चाकू भोसकून खून…
सुरज करांडे, प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २६ फेब्रुवारी २०२६) :- काळेवाडी येथे पैशाच्या वादातून झालेल्या भांडणात २४ वर्षीय तरुणाचा चाकूने भोसकून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी काळेवाडी पोलिसांनी दोघांना अटक केली असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री ११.१५ वाजता लकी बेकरी चौकातील एका दुकानासमोरील रस्त्यावर हा प्रकार घडला. फिर्यादी अरबाज सईद राईन (वय २२, रा. विजयनगर, काळेवाडी, मूळ उत्तर प्रदेश) हे त्यांच्या चुलत भावासोबत जेवण करून घरी जात असताना आरोपींनी त्यांना अडवले. आरोपी क्रमांक १ याचे पैसे देण्याच्या कारणावरून वाद सुरू झाला. “आज इसने पैसे नही दिये तो इसका मर्डर करने का,” अशी धमकी देत आरोपींनी धक्काबुक्की व मारहाण केली.
भांडण सुरू असताना फिर्यादीचा भाऊ हाशिम सईद राईन (वय २४) व इतर नातेवाईक मध्यस्थी करण्यासाठी आले. त्यावेळी आरोपी क्रमांक २ याने चाकू काढून फिर्यादीच्या डाव्या डोळ्याजवळ वार केला. फिर्यादीला वाचविण्यासाठी पुढे आलेल्या हाशिम राईन यास आरोपी क्रमांक १ ने पकडून ठेवले आणि आरोपी क्रमांक २ याने त्याच्या छातीत चाकूने वार केला. या हल्ल्यात हाशिम राईन यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी सद्दाम मो. मुमताज राईन (वय ३४) व मो. शरीफ वली खान ऊर्फ जर्सी पठाण (वय ३०, दोन्ही रा. कापसे चाळ, विजयनगर, काळेवाडी) यांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मेटे करीत आहेत.












