- पदपथावरही कचरा साचल्याने नागरिक त्रस्त; सोसायट्यांमध्ये दुर्गंधी…
अशोक लोखंडे :- संपादक तथा प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २६ फेब्रुवारी २०२६) :- मोशीतील प्रभाग क्रमांक २ मध्ये आरोग्य विभागाच्या दुर्लक्षामुळे स्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पदपथावर मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला असून, परिसरातील नागरिकांना ये-जा करताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
या पदपथाच्या दुतर्फा अनेक निवासी सोसायट्या आहेत. मात्र पदपथावरच कचऱ्याचे ढीग पडल्याने नागरिकांना चालण्यासाठी जागाच उरलेली नाही. विशेष म्हणजे पदपथावर उभारण्यात आलेल्या ओपन जिमच्या आवारातही कचरा साचलेला दिसून येत आहे. त्यामुळे व्यायामासाठी येणाऱ्या नागरिकांनाही अस्वच्छतेचा सामना करावा लागत आहे.
साचलेल्या कचऱ्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून, त्याचा परिणाम सोसायट्यांमधील रहिवाशांवर होत आहे. आरोग्याच्या दृष्टीनेही ही परिस्थिती धोकादायक असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.
महापालिकेच्या आरोग्य विभागाने तात्काळ दखल घेऊन नियमित स्वच्छता करावी, कचरा उचलण्याची व्यवस्था सुरळीत करावी आणि पदपथ मोकळा करावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.












