- अर्धवट कामे, अस्वच्छता, सुरक्षेचा प्रश्न..
- अनुचित प्रकार घडल्यास जबाबदार कोण?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २६ फेब्रुवारी २०२६) :- भोसरीतील पुणे-नाशिक महामार्गावरील राजमाता जिजाऊ महाविद्यालयाजवळ उभारण्यात आलेली भव्य कमान सध्या दुर्लक्षित अवस्थेत असल्याचे चित्र दिसून येत आहे. कोटींचा निधी खर्च करून उभारण्यात आलेली ही कमान आता दारूड्यांचा अड्डा बनल्याची खंत स्थानिक नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
कमानीच्या आतील भागात दारूच्या बाटल्यांचा अक्षरशः खच साचलेला असून, ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग पडलेले आहेत. प्लास्टिक, कचरा आणि रिकाम्या बाटल्यांमुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे.
महाविद्यालयाजवळच हा प्रकार सुरू असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. सायंकाळच्या वेळी येथे संशयास्पद हालचाली वाढत असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे.
याशिवाय कमानीचे काम पूर्णत्वास गेलेले नाही. विद्युत जोडणी, रंगरंगोटी आणि इतर सुशोभीकरणाची कामे अद्याप अर्धवट अवस्थेत आहेत. त्यामुळे कोटींची उधळपट्टी करून काय हाती लागले? या ठिकाणी भविष्यात कोणताही अनुचित प्रकार घडल्यास त्याची जबाबदारी नेमकी कोणाची? असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.
प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन कमानीचे अपूर्ण काम पूर्ण करावे, परिसराची नियमित स्वच्छता करावी आणि सुरक्षा व्यवस्थेसाठी सुरक्षारक्षकांची नियुक्ती करावी, अशी मागणी होत आहे.












