न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ जून २०१९) :- इंदोरी येथे कॅबचालकाचा गोळ्या घालून निघृण खून करण्यात आला होता. याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी आणि गुन्हे शाखा युनिट दोनच्या पोलिसांनी दोघांना नागपूरमधून अटक केली. त्यांच्याकडून दोन गावठी कट्टे, ३१ जिवंत काडतुसे आणि चाकू जप्त करण्यात आला.
वैभव उर्फ पिंटू धनराज बीजेवार (३३, रा. हनुमान गल्ली, नागपूर), दिगंबर उर्फ अक्षय मधुकर मेश्राम (२५, रा. मोर्शी, अमरावती) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. इंदोरी मावळ येथील जांबवडे – इंदोरी रस्त्यावर ज्ञानेश्वर किसन वरबडे (२२, रा. बालघरे वस्ती कुदळवाडी चिखली) या तरुणाचा पिस्तुलातून गोळ्या झाडून २१ मे रोजी खून करण्यात आला होता.
ज्ञानेश्वर कॅब चालविण्याचे काम करत होता. जून २० मे रोजी वैभव आणि दिगंबर यांनी ज्ञानेश्वर याची कॅब ताथवडेमधून बुक केली. बराच वेळ दोघांनी कॅब फिरवली. त्यानंतर तळेगाव एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत इंदोरी गावाच्या हद्दीत आल्यानंतर दोघांनी ज्ञानेश्वरच्या पोटात दोन गोळ्या घालून खून केला. आरोपींनी ज्ञानेश्वरचे एटीएम कार्ड आणि कार घेऊन पोबारा केला. या प्रकरणाचा तपास तळेगाव एमआयडीसी पोलिस आणि गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलिस संयुक्तरीत्या करीत होते. तांत्रिक आणि अन्य मुद्द्यांचा तपास घेत पोलिसांनी ज्ञानेश्वरची ओळख पटवली. जबरी चोरी करण्याच्या उद्देशाने हा खून केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे.


















