- मुदतीत वाहने न नेल्यास होणार जाहीर लिलाव..
- उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल जाधव यांचा इशारा…
मा. अशोक लोखंडे :- संपादक तथा प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ०५ मार्च २०२६) :- मोटार वाहन कर थकीत राहणे आणि मोटार वाहन कायद्याअंतर्गत केलेल्या कारवाईमुळे जप्त करण्यात आलेली तब्बल १०३ वाहने पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या ताब्यात महिन्यांपासून पडून आहेत. वाहनमालक, चालक किंवा वित्तदाते यांच्याकडून ही वाहने सोडवून नेण्यासाठी कोणताही संपर्क न झाल्याने अखेर या वाहनांचा जाहीर लिलाव करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वायुवेग पथकाने थकीत कर व इतर गुन्ह्यांमुळे ही वाहने जप्त केली होती. सध्या ही वाहने पिंपरी-चिंचवड आरटीओ कार्यालय, खेड (राजगुरुनगर) एसटी बस डेपो आणि मंचर एसटी बस डेपोच्या आवारात वाहनमालकांच्या जबाबदारीवर पार्क करून ठेवण्यात आली आहेत.
प्रशासनाच्या माहितीनुसार, या वाहनांचे मालक किंवा चालक यांनी आवश्यक कागदपत्रे सादर करून थकीत वाहन कर, पर्यावरण कर किंवा तडजोड शुल्क भरून वाहने सोडवून घेणे अपेक्षित होते. मात्र अनेक महिने उलटूनही संबंधितांकडून कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही.
दीर्घकाळ एकाच जागी उभी राहिल्यामुळे अनेक वाहनांची अवस्था खराब होत आहे. हवामानाचा परिणाम, गंज, तसेच इंधन गळतीसारख्या संभाव्य धोक्यांमुळे वाहनांची उपयुक्तता आणि बाजारमूल्य कमी होण्याची शक्यता आहे. तसेच या वाहनांची देखभाल व सुरक्षिततेसाठी प्रशासनाला अतिरिक्त मनुष्यबळ आणि साधनसामग्री खर्च करावी लागत असल्याने ताण वाढत आहे. यामुळे संबंधित सर्व वाहनमालक, चालक आणि वित्तदाते यांना पुढील ३० दिवसांत आरटीओ कार्यालयाशी संपर्क साधून थकीत कर, दंड किंवा तडजोड शुल्क भरून आपली वाहने सोडवून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
निर्धारित मुदतीत कोणीही हक्क सांगितला नाही, तर ही वाहने बेवारस समजून सक्षम प्राधिकाऱ्यांच्या परवानगीने जाहीर लिलावाद्वारे विक्री करण्यात येईल. लिलावातून मिळणारी रक्कम शासनाच्या तिजोरीत जमा केली जाईल आणि वाहने हटवून जागा रिकामी करण्यात येईल.
लिलाव प्रक्रियेबाबत माहिती देताना उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल जाधव यांनी सांगितले की, रस्त्यावर वापरण्यायोग्य वाहने eauction.gov.in या संकेतस्थळावर तर १५ वर्षांपेक्षा जुनी किंवा वापरण्यायोग्य नसलेली वाहने mstcindia.co.in या संकेतस्थळावर लिलावासाठी ठेवली जातील. लिलावाची तारीख, वेळ आणि वाहनांची यादी संकेतस्थळावर तसेच आरटीओ कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
दरम्यान, या १०३ वाहनांची यादीही प्रशासनाने प्रसिद्ध केली असून संबंधितांनी वेळेत प्रतिसाद न दिल्यास वाहने कायमची लिलावात जाणार असल्याचा इशारा आरटीओ प्रशासनाने दिला आहे.












