सुरज करांडे, प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ०५ मार्च २०२६) :- प्रेमसंबंधाच्या संशयातून पतीने पत्नीवर दगडाने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना मावळ तालुक्यात उघडकीस आली आहे. या प्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी पतीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारती राममणि कुशवाहा (वय २२, रा. म्हाळुंगे ता. खेड, जि. पुणे) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना ४ मार्च २०२६ रोजी पहाटे साडेचारच्या सुमारास मावळ तालुक्यातील सुदवडी येथे भंडारा डोंगरावरून खाली येत असताना घडली. आरोपीचे त्याच्या नात्यातील खुशबू नावाच्या महिलेसोबत प्रेमसंबंध असल्याच्या कारणावरून पती-पत्नीमध्ये वाद झाला.
वाद वाढल्यानंतर आरोपीने पत्नीला “मला तुझ्यासोबत राहायचे नाही, तू येथून निघून जा” असे म्हणत शिवीगाळ केली. त्यानंतर “आज मी तुला जिवंत सोडणार नाही, तुला मारून टाकीन” अशी धमकी देत तिला ढकलून जमिनीवर पाडले. आरोपी तिच्या अंगावर बसून बाजूला पडलेला दगड उचलून तिच्या उजव्या गालावर, उजव्या डोळ्याखाली तसेच डोक्यावर तीन ते चार वेळा वार करून गंभीर जखमी केले.
घटनेनंतर जखमी अवस्थेत असलेल्या भारती कुशवाहा यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानुसार तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून आरोपी पतीला अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रेळेकर करीत आहेत.












